पर्थ : वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या भेदक माऱ्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर विजयाच्या दिशेने कूच केली. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ५३९ धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवसअखेर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४ बाद १६९ धावांची मजल मारली होती. रविवारी खेळ थांबला त्यावेळी ५८ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या उस्मान ख्वाजा याला मिशेल मार्श (१५) साथ देत होता. दक्षिण आफ्रिका संघ पर्थवर पराभूत न होण्याचा विक्रम कायम राखण्याची आशा आहे. तेम्बा बावुमाने अफलातून क्षेत्ररक्षण करीत धोकादायक डेव्हिड वॉर्नरला (३५) माघारी परतवत दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात पहिले यश मिळवून दिले. वॉर्नरने आपल्या पुढ्यात चेंडू थोपवित धाव घेण्याचा प्रयत्न केला. बावुमाने चेंडू अडवित हवेत सूर मारला आणि नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो केला. त्या वेळी वॉर्नर काही सेंटीमीटर क्रिझच्या बाहेर होता. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या अनुपस्थितीत रबाडाने (३-४९) अचूक मारा केला. शॉन मार्श (१५) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आॅस्ट्रेलियाची २ बाद ५२ अशी अवस्था झाली होती. ख्वाजाला कामचलावू फिरकीपटू जेपी ड्युमिनीच्या गोलंदाजीवर पंचांनी बाद ठरविले, पण आॅस्ट्रेलियाने डीआरएसचा आधार घेतला. डीआरएसचा निर्णय आॅस्ट्रेलियाच्या बाजूने गेला. ख्वाजा वैयक्तिक ४१ धावांवर असताना सुदैवी ठरला. पहिल्या स्लिपमध्ये तैनात हाशिम अमलला त्याचा झेल टिपण्यात अपयश आले. ख्वाजा व स्टिव्हन स्मिथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. रबाडाने सलग षटकांमध्ये स्मिथ (३४) व एडम व्होग्स (१) यांना माघारी परतवले. त्याआधी, कालच्या ६ बाद ३९० धावसंख्येवरून पुढे खेळताना दक्षिण आफ्रिकेने आपला दुसरा डाव रविवारी चौथ्या दिवशी उपाहारानंतर ८ बाद ५४० धावसंख्येवर घोषित केला. वर्नोन फिलँडर वैयक्तिक ७३ धावसंख्येवर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथच्या गोलंदाजीवर क्लिनबोल्ड झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने डाव घोषित केला. केशव महाराजने नाबाद ४१ धावांचे योगदान दिले. फिलँडरने महाराजसोबत ७२ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)
दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व
By admin | Published: November 06, 2016 11:54 PM