केपटाऊन - खेळाच्या मैदानावर सर्वोत्कृष्ट खेळी करणा-या खेळाडूला 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवडलं जातं. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बक्षिस दिलं जातं. घाना येथील एका लीगमध्ये मॅन ऑफ द मॅच खेळाडूला बुटांचा जोड दिला जातो, तर बोस्टवाना येथे खेळाडूला बादली भरुन सामान दिलं जातं. झिम्बॉम्बेत तर खेळाडूंना बिअरचे क्रेट्सही बक्षीस म्हणून दिले जातात. काही वेगळं करण्याच्या हेतूने दक्षिण आफ्रिकेतील एका फुटबॉल लीगमधे सामन्यानंतर 'प्लेअर ऑफ द मॅच'ला बक्षीस म्हणून 5 जीबी डाटा देण्यात आला. दक्षिण आफ्रिकेतील एका खासगी टेलिकॉम कंपनी टेल्कॉमने ममेलोवी सनडाऊन्सच्या कर्णधाराला लोम्फो कोकानाला हे बक्षिस दिलं. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, लोक खिल्ली उडवत आहेत.
असे विचित्र बक्षिस दिले जाण्याच्या अशा अनेक घटना आहेत. स्की महिला वर्ल्ड कप जिंकणा-या लिंडसे वोनला बक्षिस म्हणून गाय देण्यात आली होती. याशिवाय भारतातही हरियाणामधील दोन बॉक्सर्सनाही बक्षिस म्हणून गाय देण्यात आली होती. लुईस हॅमिल्टन याला तर गुलाबपाण्याची बाटली देण्यात आली होती. त्याने शॅम्पेन समजून ती उडवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर चर्चेचा विषय ठरला होता. 51 वे प्रेसेडेंशिअल सायकलिंग टूरमध्ये पहिल्या फेरीत जिंकल्यानंतर मार्क कॅवेंडिशला बक्षिस म्हणून केळी दिली होती.