हॅमिल्टन : डेव्हिड मिलर व जेपी ड्युमिनी यांनी झळकाविलेल्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा ६२ धावांनी पराभव केला आणि विश्वकप क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. ४ बाद ८३ अशी अवस्था असताना मिलर व ड्युमिनीच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने ३३९ धावांची दमदार मजल मारली. मिलरने केवळ ९२ चेंडूंना सामोरे जाताना १३८ धावांची खेळी केली, तर ड्युमिनीने १०० चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ११५ धावा फटकाविल्या. प्रत्युत्तरात खेळताना झिम्बाब्वेने ३३ षटकांत २ बाद १९१ धावांची मजल मारत चांगली सुरुवात केली. हॅमिल्टन मसाकाजा (८०) व चामू चिभाभा (६४) यांनी अर्धशतके झळकावीत झिम्बाब्वेच्या विजयाच्या आशा कायम राखल्या. पण त्यानंतर ८६ धावांच्या मोबदल्यात अखेरच्या ८ विकेट गमावल्यामुळे झिम्बाब्वेला पराभव स्वीकारावा लागला. झिम्बाब्वेचा डाव ४८.५ षटकांत २७७ धावांत संपुष्टात आला. मसाकाजाने ७४ चेंडूंच्या खेळीमध्ये ८ चौकार व २ षटकार लगावले. चिभाभाने ८२ चेंडूंच्या खेळीत १० चौकार ठोकले. ब्रेन्डन टेलरने ४० आणि सोलोमन मिरेने २७ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने पहिल्या ५ षटकांत ३८ धावा बहाल केल्या. त्याने ९ षटकांत एकूण ६४ धावा दिल्या. लेगस्पिनर इम्रान ताहिरने १० षटकांत ३६ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर वेर्नोन फिलँडर व मोर्नी मॉर्केलने प्रत्येकी २ बळी घेतले. त्याआधी, १९९९ च्या विश्वकप स्पर्धेप्रमाणे या वेळीही दक्षिण आफ्रिकेला झिम्बाब्वेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागेल, असे चित्र होते. फॉर्मात असलेला कर्णधार एबी डिविलियर्ससह (२५) दक्षिण आफ्रिकेचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले, त्या वेळी धावफलकावर केवळ ८३ धावांची नोंद होती. मिलर व ड्युमिनी यांनी त्यानंतर पाचव्या विकेटसाठी २५६ धावांची विक्रमी भागीदारी करीत डाव सावरला. यापूर्वीचा विक्रम इंग्लंडचा इयान मॉर्गन व रवी बोपारा यांच्या नावावर होता. दोन वर्षांपूर्वी मॉर्गन व बोपारा यांनी आयर्लंडविरुद्ध डब्लिनमध्ये २२६ धावांची भागीदारी केली होती. आयपीएलमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मिलरने शतकी खेळीत ९ षटकार लगाविले. विश्वकप स्पर्धेत पदार्पणाच्या लढतीत शतकी खेळी करणाऱ्या गॅरी कर्स्टननंतर अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा, तर जगातील १५वा फलंदाज ठरला. त्याने सोलोमन मिरेच्या ४७व्या षटकात ३ षटकार व ३ चौकार ठोकले. त्या षटकात त्याने ३० धावा वसूल केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी अखेरच्या १० षटकांत १४६ धावा वसूल केल्या. मिलरने वन-डे क्रिकेट कारकिर्दीतील दुसरे, तर ड्युमिनीने चौथे शतक झळकाविले. मिलरच्या शतकी खेळीत ७ चौकार व ९ षटकारांचा समावेश आहे, तर ड्युमिनीने शतकी खेळी ९ चौकार व ३ षटकारांनी सजवली. (वृत्तसंस्था)
दक्षिण आफ्रिकेची सरशी
By admin | Published: February 16, 2015 3:00 AM