कुआंटन : भारतापुढे चौथ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज, शनिवारी दक्षिण कोरियाचे आव्हान राहणार आहे. पण दिग्गज गोलकीपर पी.आर. श्रीजेशच्या टाचेची दुखापत संघासाठी चिंतेचा विषय आहे. डिफेंडर सुरेंद्र कुमारच्या निलंबनामुळे भारतीय संघ अडचणीत आला आहे. २०११ मध्ये या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात जेतेपद पटकावणारा भारतीय संघ पुन्हा एकाद विजेतेपदाचा मान मिळवण्यास उत्सुक आहे. भारताला राऊंड रॉबिन लीगमध्ये दक्षिण कोरियाच्या युवा संघाविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर मात्र भारतीय संघाची कामगिरी उंचावली आहे. राऊंड रॉबिन लीग फेरीनंतर भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमेन्स यांनी कोरियाविरुद्धची लढत सोपी नसल्याचे कबूल केले आहे. ओल्टमेन्स म्हणाले, ‘दक्षिण कोरिया संघ दर्जेदार असून स्पर्धेत या संघाने कामगिरीचा दर्जा उंचावला आहे. त्यांचा बचाव उत्तम आहे.’ श्रीजेशच्या दुखापतीबाबत बोलताना ओल्टमेन्स म्हणाले, ‘माझ्या मते श्रीजेश खेळू शकेल. तो टाचेच्या दुखापतीतून सावरत आहे. उपांत्य फेरीत तो खेळू शकला नाही तर राखीव फळीतील आकाश चिकटे चांगला गोलकीपर आहे.’ भारताला रूपिंदर पाल सिंगच्या यशाचा लाभ मिळत आहे. या स्पर्धेत तो पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी ठरला आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक १० गोल नोंदवले आहेत. भारताला सुरेंदरची उणीव भासू शकते. मलेशियाविरुद्ध संघाच्या अखेरच्या लीग सामन्यादरम्यान नियमबाह्य पद्धतीने खेळ करणाऱ्या सुरेंदरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. स्पर्धेची दुसरी उपांत्य लढत यजमान मलेशिया आणि पाकिस्तान संघांदरम्यान खेळली जाणार आहे. त्यात यजमान संघ लीग फेरीतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहे. लीग फेरीत मलेशियाने पाकचा पराभव केला होता. (वृत्तसंस्था)
दक्षिण कोरिया-भारत लढत आज
By admin | Published: October 29, 2016 3:27 AM