ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 15 - स्पेनची अव्वल महिला टेनिसपटू गर्बाइन मुगुरुझाने अमेरिकेच्या अनुभवी व्हिनस विलियम्सला नमवून विम्बल्डनच्या महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. तिने 7-5, 6-0 असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. अवघ्या एक तास 17 मिनिटात मुगुरुझाने विजेतेपदावर नाव कोरले. संपूर्ण सामन्यावर वर्चस्व राखताना तिने अनुभवी व्हिनसला एकदाही डोकेवर काढण्याची संधी दिली नाही. मुगुरुझाचे कारकिर्दीतील हे पहिलेचे विम्बल्डनचे जेतेपद आहे.
मुगुरुझाचे विम्बल्डनचे पहिले तर, ग्रँण्डस्लॅमचे दुसरे विजेतेपद आहे. 2016 मध्ये तिने फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. पहिल्या सेटमध्ये व्हिन्सने थोडाफार प्रतिकार केला पण दुस-या सेटमध्ये मुगुरुझाने आपल्या खेळाने व्हिन्सला पूर्ण निष्प्रभ करुन टाकले. पाचवेळा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरणारी व्हिन्स नऊ वर्षात पहिल्यांदाच विम्बल्डनची अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली होती. पण तिला या संधीचे विजयामध्ये रुपांतर करता आले नाही.
आणखी वाचा
व्हिन्सने जेतेपद मिळवले असते तर, ती अशी कामगिरी करणारी सर्वात वयस्कर महिला टेनिसपटू ठरली असती. मुगुरुझाला स्पर्धेत 14 वे सीडींग मिळाले होते. उपांत्य फेरीत मुगुरुझाने जागतिक क्रमवारीत ८७व्या स्थानी असलेल्या स्लोवाकियाच्या मग्दालेना रीबारिकोवा हिचा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली होती. गर्बाइन मुगुरुझाने कारकिर्दीत दुसऱ्यांदा विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली.
याआधी २०१५ साली मुगुरुझा विम्बल्डनमध्ये उपविजेती ठरली होती. यंदा स्टार खेळाडू सेरेना विलियम्स आणि मारिया शारापोवा यांच्या अनुपस्थितीमध्ये मुगुरुझाला पहिले विम्बल्डन जेतेपद जिंकण्याची नामी संधी होती. ती तिने साधली. उपांत्य फेरीत मुगुरुझाने अपेक्षित विजय मिळवताना आपल्याहून अनुभवात कमी असलेल्या रीबारिकोवाचा ६-१, ६-१ असा फडशा पाडला. केवळ १ तास ५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुगुरुझाच्या धडाक्यापुढे रीबारिकोवाचा काहीच निभाव लागला नाही. रीबारिकोवाने केलेल्या अनेक चुकांचा फायदा मुगुरुझाला झाल्याने तिला अंतिम फेरी गाठण्यात काहीच त्रास झाला नाही. दरम्यान, दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या मुगुरुझाला याआधी २०१५ साली बलाढ्य सेरेना विलियम्सविरुद्ध पराभव झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.