विनय उपासनी, मुख्य उपसंपादक, लोकमतफुटबॉलच्या मैदानावरचा किलियन एम्बापे हे एक अजब रसायन आहे! उशाशी फुटबॉल नसेल, तर या माणसाला झोपही येत नाही!
मैदानावरच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपल्या पायांच्या सामर्थ्याने गोलजाळ्यात चेंडू तडकावणं हे कोणत्याही फुटबॉलपटूचं स्वप्न. अंग-प्रत्यंगाला थकवून, दमवून टाकणाऱ्या या धसमुसळ्या खेळाच्या विश्वविजेत्या संघाचा भाग असणं ही त्यापुढची पायरी. आणि विश्वविजेतेपदासाठी सुरू असलेल्या अंतिम सामन्यात सर्वांच्या नजरा आपल्या कामगिरीकडे असणं हा खेळाडूच्या कारकिर्दीचा परमोच्च बिंदू.
लेखासोबत जोडलेलं छायाचित्र कालपासून अब्जावधी लोकांनी पुन:पुन्हा पाहिलं असेल. तादात्म्य पावणं, एकरूप होणं, देहभान हरपून समरस होणं... ही सर्व आध्यात्मिक शब्दविशेषणं या छायाचित्राला तंतोतंत लागू होतात. आपलं पद काय, आपण कोण आहोत, या कशाकशाचं यत्किंचितही भान न ठेवता एका बलाढ्य देशाचा प्रमुख थेट मैदानात धाव घेऊन आपल्या खेळाडूचं सांत्वन करत आहे... हीच या खेळाची ताकद आणि नजाकत... छायाचित्रात दिसणारे दोघेही आपापल्या क्षेत्रातले धुरीण. इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष तर किलियन एम्बाप्पे फ्रान्सच्या राष्ट्रीय संघाचा आधारस्तंभ. अर्जेंटिनाच्या गोझालो मॉटिएलने विजयी गोल मारल्यावर याच आधारस्तंभाने मैदानात बसकण मारली. त्याला आधार देण्यासाठी मॅक्रॉन यांनी थेट मैदानात धाव घेतली. किलियन एम्बाप्पे हे रसायन अजब आहे. एका बदनाम शहराचं प्रतिनिधित्व करणारा एम्बाप्पे फ्रेंचांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसपासून अवघ्या दहा किमी अंतरावर बॉण्डी हे उपनगर आहे. खरं तर फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही काळाच्या कसोटीवर टिकणारी शिकवण दिली. मात्र, त्यावर बोळा फिरवण्याचं काम बॉण्डीवासीय इमानेइतबारे करतात. जातीय, वांशिक दंगलींसाठी बॉण्डी बदनाम आहे. गुंडागर्दी, दहशतवाद यांना खतपाणी घालणारं शहर म्हणजे बॉण्डी, एवढं हे शहर बदनाम आहे. अशा या बदनाम शहरात २० डिसेंबर १९९८ रोजी किलियन एम्बाप्पेचा जन्म झाला. फ्रान्सने १९९८ मध्ये जेव्हा पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकला त्यावेळी एम्बाप्पेचं वय होतं अवघं सहा महिने. घरचं वातावरण मध्यमवर्गीय. आई फायझा लामारी अल्जेरियन वंशाची. फ्रान्सच्या राष्ट्रीय हॅण्डबॉल संघातील प्रमुख खेळाडू म्हणून तिची कारकीर्द गाजली होती. तर वडील विल्फ्रेड एम्बाप्पे मूळचे कॅमेरूनचे. मात्र, नोकरी-व्यवसायानिमित्त फ्रान्समध्ये स्थायिक झालेले. फुटबॉल प्रशिक्षक म्हणून त्यांनी करिअरची निवड केली. आपल्या मुलानेही फुटबॉलमध्ये करिअर करावं अशी विल्फ्रेड यांची प्रामाणिक इच्छा होती. किलियननेही वडिलांची ही इच्छा पूर्ण केली आहे. अद्याप सुफळ संपूर्ण होणं तेवढं बाकी आहे.
एम्बाप्पेचं फुटबॉलचं प्रेम एवढं की त्याला निजतानाही उशाशी फुटबॉलच लागतो. वयाच्या सहाव्या वर्षापासून किलियन फुटबॉलच्या मैदानावर खेळू लागला. चेंडूवरील मजबूत पकड, प्रतिस्पर्ध्याला सहज हुलकावणी देत चेंडू गोलजाळ्याकडे ढकलण्याचं कसब यामुळे अल्पावधीतच किलियन प्रशिक्षकांचा लाडका बनला. रिआल माद्रिद, मँचेस्टर सिटी, बायर्न म्युनिक, लिव्हरपूल या फुटबॉल क्लब्जचं लक्ष किलियनकडे गेलं. चेल्सी क्लबकडून खेळणारा सर्वात लहान फुटबॉलपटू अशी त्याची ख्याती झाली. अकराव्या वर्षीच एम्बाप्पे चेल्सीकडून खेळण्यासाठी लंडनला रवाना झाला. मोनॅकोकडून खेळत एम्बाप्पेने वयाच्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केलं. २० फेब्रुवारी २०१६ रोजी त्याने पहिल्या गोलची नोंद केली.
गेल्या वेळच्या वर्ल्डकप स्पर्धेत एम्बाप्पेला राष्ट्रीय संघाची दारं खुली झाली. २१ जून २०१८ रोजी एम्बाप्पेने पहिल्या वर्ल्डकप गोलची नोंद केली. तत्पूर्वी २०१७ मध्ये पॅरिस सेंट जर्मेन या फ्रेंच क्लबशी तब्बल १८० दशलक्ष डॉलरचा करार करून एम्बाप्पे जगातला दुसऱ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला. मात्र, पैशांची हवा त्याच्या डोक्यात कधीच गेली नाही. फुटबॉलचा ताबा लीलया घेणारे त्याचे पाय आजही मातीत घट्ट रुतून आहेत. अशा या अजब फ्रेंच रसायनाचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न पुढील वर्ल्डकपला पूर्ण होवो, हीच आज त्याच्या वाढदिवशी सदिच्छा..vinay.upasani@lokmat.com