मुंबई : पदकप्राप्त खेळाडूंना २०२० च्या आॅलिम्पिकसाठी घडविण्याची एक विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याची चाचणी, निवडपद्धती अंमलात येत आहे, असे राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. जुहू येथील व्यायामशाळेच्या लोकार्पण सोहळ््यात ते बोलत होते. खेळाडूंना घडविणा-या प्रशिक्षकांनाही घडविण्याची मोहीम क्रीडा विभाग राबविणार असून याद्वारे प्रशिक्षकांची कमतरता दूर करणार आहे, असेही तावडे म्हणाले.प्रत्येक खेळानुसार विशेष व्यायामाचे धडे देणारी एक आगळी वेगळी व्यायामशाळा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. जनसेवा मंडळाच्या पुष्पकांत म्हात्रे क्रीडा अकादमीच्या वतीने खास खेळाडूंसाठी सुरू करण्यात आलेल्या या व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा क्रीडामंत्र्याच्या हस्ते झाला. यावेळी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडू तसेच प्रशिक्षक यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल ही काळजीवाहू पद्धतीने त्या-त्या भागातील संस्थांना देण्याचा आमचा मानस आहे. राज्यात कोल्हापूरला शूटिंग, नाशिकला अॅथलेटिक्स या पद्धतीने त्या त्या जिल्ह्यांच्या क्रीडा वैशिष्ट्यांचा विचार करुन स्पोर्ट्स मॅप तयार करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
आॅलिम्पिक २०२० साठी विशेष मोहीम - विनोद तावडे
By admin | Published: January 29, 2016 3:20 AM