- स्वदेश घाणेकरखेलो इंडिया 2020 : गुवाहाटी येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे जवळपास 500 खेळाडू रवाना झाले. खेलो इंडिया 2020 युथ गेम्स महोत्सवातील जिम्नॅस्टिक्स, कबड्डी व व्हॉलिबॉल या स्पर्धांना आजपासून झाला. महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्स, कबड्डी व व्हॉलिबॉल या संघांसह टेबलटेनिस व नेमबाजपटू गुवाहाटीसाठी रवाना झाले. पण, मुंबईच्या विमानतळावर महाराष्ट्राच्या नेमबाजांना अत्यंत वाईट अनुभव आला. खेळाडूंना जवळपास साडेचार तास सुरक्षारक्षकांच्या चौकशीला सामोरे जावे लागले, त्यानंतरही दोन नेमबाजांच्या पदरी निराशा आली. मुंबईच्या विमानतळावर त्यांच्यासोबत संतापजनक प्रकार घडला.
गुवाहाटी येथे आजपासून खेलो इंडिया 2020 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेमबाज गुरुवारी मुंबईच्या विमानतळावर दाखल झाले. महाराष्ट्राचे जवळपास 500 खेळाडू विविध विमानानं गुवाहाटी येथे दाखल होणार होते. नेमबाजांसह 36 जणांसाठी स्पाईस जेटच्या 6265 या विमानाचं तिकिट बुक करण्यात आलं होतं. नेमबाजांसोबत असलेल्या शस्त्रांच्या तपासासाठी विमानतळावर बराच वेळ जातो, हे माहित असल्यानं नेमबाजपटू व अधिकारी जवळपास साडेचार तास पूर्वीच मुंबई विमानतळावर दाखल झाले होते.
खेलो इंडिया 2020 : महाराष्ट्राच्या जुळ्या बहिणींचे जागतिक स्तरावर प्राविण्य मिळविण्याचे लक्ष्य
यावेळी विमानतळावरील सुरक्षारक्षकांनी नेमबाजांकडील असलेले शस्त्र परवानं, क्रीडा मंत्रालयाचे पत्र आणि अन्य कागदपत्र तपासली. त्यानंतर कोणतंही कारण न देता सुरक्षारक्षकांनी महाराष्ट्राच्या दोन नेमबाजांना शस्त्र नेण्यास परवानगी नाकारली. क्रीडा मंत्री, अन्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून सुरक्षारक्षकांकडे विनंती करूनही त्यांनी शस्त्र नेण्यास परवानगी दिली नाही. यात शॉट गनसह रायफलचा समावेश आहे. या तपासात चार तास वाया गेल्यामुळे दोन नेमबाजांना शस्त्रांशिवाय गुवाहाटी येथे जावे लागले. त्यामुळे आता त्यांना गुवाहटी येथे स्पर्धेदरम्यान प्रतिस्पर्धींकडून शस्त्र उसनं घ्यावी लागणार आहेत, अशी माहिती नेमबाज प्रशिक्षक विश्वजीत शिंदे यांनी 'लोकमत'ला दिली. याबाबत सुरक्षारक्षकांकडे नियमाची प्रत दाखवण्याची विनंती केली असता, तिही त्यांनी धुडकावून लावली.
महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरीया यांनीही स्पाईस जेटच्या या वागण्यावर तीव्र नाराजी प्रकट केली. त्यांनी याची तक्रार केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्राचे नेमबाजहर्षदा निथवे, राबिया अकबर काकटिकर, वरिधी गोराय, शुभांगी सुर्यवंशी, जान्हवी देशमुख, शर्वरी भोईर, समर्थ मंडलीक, सैराज काटे, नुपूर पाटील, शवरी पाखळे, मोहित गोवडा, रुद्रांक्ष विश्वंभर, शाहु माने, विराज पाटील, यशिका शिंदे, भक्ती खामकर, विराज रोकडे, हर्षवर्दन यादव, रामशा कितेकर, अभिषेक पाटील.