कराची : आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी वन-डे वर्ल्डकपमध्ये फिरकी गोलंदाजसुद्धा (स्पिनर्स) महत्त्वाची भूमिका निभावतील, असे मत पाकिस्तानचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक मुश्ताक अहमद याने व्यक्त केले आहे़मुश्ताक म्हणाला, की आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांचा दबदबा असतो; मात्र या वेळी फिरकी गोलंदाजही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावतील अशी आशा आहे़ वर्ल्डकपमधील पाकिस्तानच्या कामगिरीबद्दल मुश्ताक म्हणाला, की अनुभवी गोलंदाज सईद अजमल आणि मोहंमद हाफिज यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़ त्यामुळे नक्कीच पाक संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल यात शंका नाही़ अनेक वर्षांपासून पाक संघात अजमल, हाफिज आणि शाहिद आफ्रिदी आपल्या फिरकीच्या बळावर प्रतिस्पर्धी संघांना अंकुश लावण्याचे काम करीत आहेत़ आता पाकला या दोन्ही खेळाडूंची उणीव भासेल़ जुल्फिकार बाबर आणि यासिर शाह यांनी आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रभावी कामगिरी केली आहे़ त्यामुळे पाक निवडकर्ते वर्ल्डकपसाठी त्यांच्या नावाचा विचार करतील, अशी असेही मुश्ताक याने म्हटले आहे़ दरम्यान, संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे पाक संघातून बाहेर झालेल्या मोहंमद हाफिजने चेन्नईत आपल्या गोलंदाजीची चाचणी दिली आहे़ त्याचा अहवाल लवकरच येण्याची शक्यता आहे़ यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) गोलंदाजी चाचणी केंद्रात पाठविण्यात येणार आहे, असेही मुश्ताक यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था) प्रतिस्पर्धी संघांच्या धावसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम फिरकी गोलंदाज प्रभावीपणे करतील.- मुश्ताक अहमद
‘वर्ल्डकपमध्ये स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची’
By admin | Published: January 03, 2015 1:46 AM