मुंबईत होणार धडाका : आॅलिम्पिकच्या धर्तीवर स्पर्धा
मुंबई : सर्व शालेय खेळाडूंना एकाच छताखाली आणून आॅलिम्पिकच्या धर्तीवर 'स्पोर्ट्स फॉर आॅल' आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राची बुधवारी मुंबईत घोषणा करण्यात आली. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे, गेल्यवर्षी एक प्रयोग म्हणून सुरुवात केलेल्या या उपक्रमामध्ये ९ विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, मात्र पहिल्याच वर्षी मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर खेळांची हीच संख्या यंदा २६ वर गेली आहे. त्यामुळे स्पोटर््स फॉर आॅल स्पर्धेची यंदा उत्सुकता शिगेला पोहचली आहे.केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली नसून भारतातील कोणत्याही शाळेचा विद्यार्थी किंव संघ या स्पर्धेत सहभाग नोंदवू शकतो. 'स्पोर्ट्स फॉर आॅल' चे संस्थापक ॠषिकेश जोशी आणि या स्पर्धेसाठी सहकार्य केले डॉ. डीवाय विद्यापिठ आणि स्टेडियमचे प्रमुख डॉ. विजय पाटील यांनी यावेळी यंदाच्या सत्राची घोषणा करताना पहिल्या सत्राचे सांघिक विजेते फादर अॅग्नेल स्कूलचे प्रशिक्षक रवी नायर यांना विजयी चषक प्रदान केला.५ ते २४ डिसेंबर दरम्यान, रंगणाऱ्या या स्पर्धेतील सामने नेरुळ येथील डॉ. डीवाय पाटील स्पोटर््स स्टेडियम, मुंबई विद्यापीठ मैदान आणि मुंबई हॉकी संघटनेच्या मैदानावर पार पडतील. या स्पर्धेत सुमारे ३५ हजार शालेय खेळाडू विजेतेपदासाठी खेळतील. एकूण १५ दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत २६ खेळांचा समावेश असून त्यातील १९ आॅलिम्पिक खेळ आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)स्पर्धेत समावेश असलेले खेळ :हँडबॉल, फुटबॉल, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, थ्रोबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॉश, कॅरम, बुध्दिबळ, अॅथलेटिक्स, जिमनॅस्टिक्स, एमएमए, तायक्वांडो, बॉक्सिंग, ज्युडो, कराटे, तलवारबाजी, नेमबाजी, तिरंदाजी, जलतरण आणि वॉटरपोलो.पहिल्या वर्षी मिळालेल्या तुफान यशानंतर आता आम्ही अधिक आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहोत आणि यंदा खेळांची संख्या ९ वरुन थेट २६ वर आली आहे. आम्हाला अनेक शाळांचा आणि क्रीडा संघटनांच पाठिंबा मिळत असून त्याद्वारे देशात क्रीडा संस्कृती रुजविण्याचे आमचे स्वप्न आम्ही नक्की पुर्ण करु. खेळाडूंना आम्ही सर्वोतोपरी मदत करणार असून गुणवान खेळाडूंना विशेष शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येईल.- ॠषिकेश जोशी'स्पोर्ट्स फॉर आॅल' ही संकल्पना शालेय खेळाडूंसाठी खूप प्रेरणादायी आहे. एकाच छताखाली महापालिका शाळेचा खेळाडूला इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूविरुद्ध खेळताना पाहण्याचा अनुभव जबरदस्त असतो. खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव 'स्पोर्ट्स फॉर आॅल' च्या माध्यमातून होत आहे. गतवर्षी मिळालेल्या यशाने मी खूप प्रभावित झालो असून यंदा त्याहून अधिक चांगली कामगिरी होईल, असा विश्वास आहे.- डॉ. विजय पाटील