ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या 'प्रजासत्ताक दिना'चे निमित्त साधून स्पोर्ट्स हिरोंच्या 'राष्ट्रगीता'च्या व्हिडीओचे मुंबईत अनावरण करण्यात आले. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, गगन नारंग, बायचुंग भूतिया, धनराज पिल्ले, महेश भूपती, सानिया मिर्झा या क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी व्हिडीओत 'जन गण मन' हे राष्ट्रगीत म्हटले असून मुंबईत आज सर्व खेळाडूंच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडला.
माजी क्रिकेटपटू निलेश कुलकर्णीच्या संकल्पनेतून हा व्हिडीओ तयार झाला असून त्याच्या माध्यमातून सर्व खेळाडू आजच्य मुलांना अभ्यासासोबतच खेळांकडे वळण्याचाही संदेश देत आहेत. अभिजीत पानसे यांनी या व्हिडीओचे दिग्दर्शन केले असून राम संपत यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मानेवर प्रचंड अभ्यासाचं जोखड ठेवून वावरणा-या विद्यार्थ्यांना फक्त शाळेच्या चार भिंतीत नव्हे तर बाहेरच्या जगातील शिक्षणही महत्वाचं आहे. अभ्यासासोबतच निसर्गाच्या सानिध्यात राहून, विविध खेळ खेळल्याने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकासही होतो. अभ्यासासोबतच खेळांचंही महत्व पटवण्यासाठी 'आयआयएसएम'ने(इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टस मॅनेजमेंट) हा व्हिडीओ आणला आहे. सशक्त समर्थ भारतासाठी नवी प्रेरणा, नव मैदान घेऊन आपल्या मातीतील हे हिरो आपल्या भेटीसाठी आले आहेत.
राष्ट्रगीताचा मुद्दा निघाला की तुम्ही मेंदून नाही मनाने विचार करायला लागता. २००३ सालच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तब्बल ६० हजार प्रेक्षक एकत्रितरित्या 'जन गण मन' गात होते, तो क्षण माझ्यासाठी अतिशय अविस्मरणीय होता, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या भावना व्यक्त केल्या.