क्रीडा लोकल खो-खो
By admin | Published: February 20, 2015 1:10 AM
दिल्लीची नागपूरवर मात
दिल्लीची नागपूरवर मातमहापौर चषक अ.भा. खो-खो स्पर्धा : तेलंगणा, केरळ, इचलकरंजी संघांची विजयी सलामीनागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुरुष व महिलांच्या महापौर चषक अखिल भारतीय खो-खो स्पर्धेत महिला गटातील पहिल्याच सामन्यात दिल्लीच्या यंग वूमन संघाकडून नागपूर जिल्हा संघाला पराभव स्वीकारावा लागला. पुरुष विभागात इचलकरंजीचा जयहिंद क्रीडा मंडळ, तेलंगणा खो-खो असोसिएशन, केरळ -१२ संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत विजयी सलामी दिली.रा.पै. समर्थ स्टेडियम (चिटणीस पार्क) येथे प्रारंभ झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनिल सोले, माजी खो-खोपटू व नीरीचे संचालक सतीश वटे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, भारतीय खो-खो महासंघाचे सुरेश शर्मा, विदर्भ खो-खो संघटनेचे सचिव रामदास दरणे, नागपूर जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष गिरीश व्यास, मनपा शिक्षण सल्लागार समितीच्या अध्यक्ष चेतना टांक, माजी राष्ट्रीय खो-खोपटू उषा लोहरकर, मनपा उपायुक्त प्रमोद भुसारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्टेडियमवरील मुख्य क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा आयोजन समितीचे संयोजक सुधीर राऊत यांनी केले. संचालन डॉ. हंबीरराव मोहिते यांनी केले आणि क्रीडा व सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष हरीश दिकोंडवार यांनी आभार मानले. स्पर्धेत सहभागी संघांतील खेळाडूंना नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त महाराष्ट्र संघाची सदस्य सोनाली मोकासेने शपथ दिली. स्पर्धेला आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी सदिच्छा भेट दिली.महिला विभागात दिल्ली संघाने नागपूरचा(११-१०)ने चार मिनिटे शिल्लक ठेवीत एका गड्याने पराभव केला. पुरुष गटातील चुरशीच्या सामन्यात जयहिंद क्रीडा मंडळाने (इचलकरंजी)महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीचा(मुंबई उपनगर)२१-१९ ने पराभव केला. याच गटातील दुसऱ्या सामन्यात तेलंगणा खो-खो असोसिएशनने पश्चिम बंगाल खो-खो असोसिएशनला १९-१८ म्हणजे एका गड्याने नमविले. याच गटातील तिसऱ्या सामन्यात केरळ-१२ संघाने नायकवाडी (सांगली) येथील अरुण भय्या संघाला १७-१६ ने पराभूत केले. (क्रीडा प्रतिनिधी)