ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ : २० वर्षांखालील विश्व चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्ण विजेता भारतीय खेळाडू नीरज चोप्रा याचा केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी बुधवारी एका सोहळयात सन्मान केला. हरियाणाच्या १८ वर्षांच्या नीरजने पोलंडमधील २० वर्षे गटाच्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये ८६.४८ मीटर भालाफेक करीत विश्वविक्रम नोंदविला होता. सुवर्णाचा मानकरी ठरलेल्या नीरजने लॅटेव्हियाचा जिगिस्मन्ड सिरमायस याचा ८४.६९ मीटरचा विक्रम मोडीत काढला.
क्रीडामंत्र्यांनी नीरजच्या विश्वविक्रमी कामगिरीवर देशाला गौरव असल्याचे म्हटले आहे. २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये नीरजने पदक जिंकावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नीरजच्या कामगिरीपासून युवा खेळाडू प्रेरणा घेतील अशी अपेक्षा व्यक्त करीत गोयल यांनी देशवासीयांतर्फे नीरज आणि त्याच्या कोचचे अभिनंदन केले. त्याआधी क्रीडा मंत्रालयाने नीरजला या कमगिरीसाठी दहा लाख रुपयाचे रोख बक्षीस दिले.