नवी दिल्ली : अथेन्स आॅलिम्पिकचे रौप्यपदकविजेते नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड यांची रविवारी विजय गोयल यांच्या स्थानी नवे क्रीडामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. गोयल यांच्याकडे संसदीय मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला. राठोड आतापर्यंत सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कॅबिनेट विस्तारामध्ये राठोड यांनी गोयल यांचे स्थान घेतले.कर्नल राठोड यांनी १९९० च्या दशकात शूटिंग रेंजमध्ये पाऊल ठेवले होते. त्यानंतर आॅलिम्पिकमध्ये भारताचे पहिले वैयक्तिक रौप्यपदक विजेते ठरले होते. २००४ मध्ये अथेन्स आॅलिम्पिकमध्ये पुरुषांच्या डबल ट्रॅप नेमबाजीमध्ये ते दुसºया स्थानी होते. आॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या वर्षभरापूर्वी २००३ मध्ये सिडनी येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी रौप्यपदकाचा मान मिळवला होता.अथेन्स आॅलिम्पिकपूर्वी राठोड यांना सेनादलाच्या मार्कमॅनशिप युनिटसह दोन वर्षांसाठी दिल्लीमध्ये तैनात करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना तेथे तुघलकाबाद शूटिंग रेंजमध्ये सराव करण्याची संधी मिळाली. राठोड यांनी फ्रॅक्चर व प्रोलेप्स्ड डिस्क यातून सावरताना आॅलिम्पिक पदक पटकावले होते. अथेन्समध्ये पात्रता फेरीत पाचवे स्थान पटकावताना त्यांनी अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली व रौप्यपदक पटकावले.सैनिक कुटुंबात जन्मलेल्या राठोड यांनी राष्ट्रीय डिफेन्स अकादमीची परीक्षा पास केली होती. भारतीय सेनेमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीच्या दोन वर्षांत काश्मीरमधील दहशतवाद्यांसोबत लढा दिला. त्यामुळे त्यांना आॅलिम्पिक फायनलमध्ये लय कायम राखण्यात मदत मिळाली असल्याचे त्यांच्या आईचे मत आहे. राठोड जयपूरच्या ‘नाईन ग्रेनेडियर्स’सोबत जुळले. या दलाचे नेतृत्व त्यांचे वडील कर्नल (सेवानिवृत्त) लक्ष्मण सिंग राठोड यांनी सांभाळले होते. भारतीय सेनेतून वेळेपूर्वीच सेवानिवृत्ती स्वीकारल्यानंतर राठोड २०१३ मध्ये भारतीय जनता पक्षासोबत जुळले आणि मे २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तारुढ झाल्यानंतर त्यांनी सूचना व प्रसारण राज्यमंत्रिपद सांभाळले. खेळाडूंना सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देण्यास प्रतिबद्ध : राठोडमाझ्या कार्यकाळात सर्व खेळाडूंना सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देण्यास प्रतिबद्ध असल्याची प्रतिक्रिया नवनियुक्त क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी व्यक्त केली. यामुळे भारताला खेळामध्ये मोठी शक्ती म्हणून नावलौकिक मिळवण्यास मदत होईल.राठोड म्हणाले, ‘कुठलीही पातळी असो, ग्रामीण किंवा आॅलिम्पिक पण पदक जिंंका. क्रीडा हा राज्याचा भाग आहे त्यामुळे आम्ही राज्यातील विभागाच्या सहकार्याने काम करणार आहोत. त्यामुळे खेळाडूंना सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देता येईल. परिस्थितीवर मात करत खेळाचा दर्जा उंचावण्याचे खेळाडूंपुढे आव्हान असते. त्याच्यासोबत युवांनी केवळ खेळच नाही तर व्यक्तित्व विकासावर काम करायला हवे.’
क्रीडामंत्रिपद आॅलिम्पिक पदकविजेत्याकडे, राज्यवर्धनसिंग राठोड नवे क्रीडामंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 1:17 AM