नवी दिल्ली : ‘माझ्यासाठी खेळाडू व्हीआयपी असेल.’ सन्मान आणि सुविधा पुरविण्यास प्राधान्य देत क्रीडा मंत्रालयाचा चेहरामोहरा बदलण्याचा मानस नवे क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सोमवारी व्यक्त केला.अथेन्स आॅलिम्पिक २००४ मध्ये नेमबाजीचे रौप्यपदक विजेते राहिलेले राठोड यांची कालच विजय गोयल यांच्याऐवजी क्रीडा आणि युवा मंत्रालयाचे (स्वतंत्र प्रभार) मंत्री म्हणून नियुक्ती झाली. आज त्यांनी पदभार सांभाळल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राठोड म्हणाले, ‘सर्वांत आधी मला मंत्रालयाचा चेहरामोहरा बदलायचा आहे. माझ्यासाठी व्हीआयपी केवळ खेळाडू असेल, अन्य कुणीही नाही. सर्वांचा असाच दृष्टिकोन असायला हवा.’‘एक खेळाडू ते मंत्री’ या प्रवासाला उजाळा देताना ते पुढे म्हणाले, ‘खेळाडूला काय अडचणी येतात याची मला जाणीव आहे. खेळाडूचा मंत्रालयाशी थेट कसा संपर्क राहील, ही बाब सोपी करू इच्छितो.’जयपूरचे(ग्रामीण) लोकसभेत प्रथमच प्रतिनिधित्व करीत असलेले राठोड म्हणाले,‘क्रीडा मंत्रालयाचा माझा प्रवास ‘रिसेप्शन’ पासून सुरू होतो. येथे येण्याची परवानगी घ्यावी लागते. येथे खेळाडूंना येणाºया अडचणींची मला जाणीव आहे. खेळाडूंची मदत करणारे काही चांगले अधिकारी देखील येथे आहेत. अशा अधिकाºयांची संख्या वाढविण्यावर भर असेल. स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असलेल्या खेळाडूंना आमची कधीही गरज असल्याने हे मंत्रालय २४ तासांचे असेल. खेळाडूंच्या सेवेसाठी असल्याने आम्हाला त्यांच्यासाठीच काम करावे लागेल. खेळाडूंना सन्मान, सुविधा देण्यावर मी फोकस करणार आहे.’क्रीडा विकास विधेयक संसदेच्या पटलावर ठेवणे, खेळ फिक्सिंगमुक्त ठेवण्यासाठी काय प्रयत्न होतील,असे विचारताच ते म्हणाले, ‘मीविविध योजनांकडे लक्ष देणार आहे. भारतीय खेळांमध्ये फिक्सिंगसारखे प्रकार होणार नाहीत याकडे विशेष लक्ष असेल.’ (वृत्तसंस्था)माजी खेळाडू या नात्याने तुमच्यावर अपेक्षांचे अधिक ओझे असेल का, असे विचारताच ते म्हणाले, ‘खेळाने मला आव्हानांचा सामना करणे शिकविले आहे. अपेक्षा तर आधीपासून आहेत. पण खेळाडू पराभवाला घाबरत नाही. जय-पराजयाच्या भीतीने माघार घेणे मला पसंत नाही.’
माझ्यासाठी केवळ खेळाडू ‘व्हीआयपी’, मंत्रालयाचा चेहरामोहरा बदलण्यावर भर देणार: क्रीडामंत्री राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 2:21 AM