क्रीडा रणजी
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM
तामिळनाडूची उपांत्य फेरीत धडक
तामिळनाडूची उपांत्य फेरीत धडकरणजी करंडक क्रिकेट : विदर्भ पराभव टाळण्यात यशस्वीजयपूर : तामिळनाडूने शुक्रवारी विदर्भाविरुद्ध अनिर्णित संपलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पहिल्या डावातील १४४ धावांच्या आघाडीच्या आधारावर रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तामिळनाडू संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. विदर्भाला अखेरच्या दिवशी विजयासाठी ४११ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाची ८ बाद १४२ अशी अवस्था असताना उभय कर्णधारांनी सामना अनिर्णित संपल्याचे मान्य केले. तामिळनाडूने पहिल्या डावात ४०३ धावांची मजल मारली होती. प्रत्युत्तरात खेळताना विदर्भाचा पहिला डाव २५९ धावांत संपुष्टात आला. तामिळनाडूने पहिल्या डावात १४४ धावांची मिळविलेली आघाडी अखेर निर्णायक ठरली. कालच्या ६ बाद १९३ धावसंख्येवरून पुढे खेळताना तामिळनाडूचा दुसरा डाव आज शेवटच्या दिवशी २६६ धावांत संपुष्टात आला. विदर्भातर्फे स्वप्नील बंडीवारने ४२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर रवीकुमार ठाकूर व राकेश ध्रुव यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले. ४११ धावांच्या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाची ४ बाद ६८ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर गणेश सतीशने (नाबाद ५९) अर्धशतकी खेळी करीत विदर्भाचा पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ६ चौकारांचा समावेश आहे. शलभ श्रीवास्तव (३३) आणि राकेश ध्रुव (२२) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. तामिळनाडूतर्फे बाबा अपराजितने ४१ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. प्रशांत परमेश्वरनने २ तर लक्ष्मीपती बालाजी व मालोलन रंगराजन यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी परतवले. (वृत्तसंस्था)