नवी दिल्ली : अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याला आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे होणाºया २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी १८ सदस्यांच्या भारतीय पुरुष हॉकी संघात स्थान मिळाले आहे, तर माजी कर्णधार सरदार सिंह याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद मनप्रीत सिंह याच्याकडे सोपवण्यात आले आहे. भारताला पूल ‘बी’ मध्ये पाकिस्तान, मलेशिया, वेल्स आणि इंग्लंडच्या संघात ठेवण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना ७ एप्रिल रोजी पाकसोबत होईल. मुख्य प्रशिक्षक शोर्ड मरिन यांनी सांगितले, ‘आशिया चषक २०१७ पासून आतापर्यंतचा खेळ पाहूनच खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. आम्ही संघात अनेक बदल केले आहेत. आमचे मत आहे, की आमचे गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेसाठी केलेले संयोजन हे सर्वात प्रभावी असेल. आम्ही अझलान शाह स्पर्धेत पदक जिंकू शकलो नाही. त्यामुळे राष्ट्रकुलमध्ये आमच्या खेळावर कोणताही फरक पडणार नाही.’ संघ पुढीलप्रमाणे : गोलकीपर पी. आर. श्रीजेश, सूरज करकेरा, डिफेंडर रुपिंदरपाल सिंह, हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, कोथाजित सिंह, गुरिंदर सिंह, अमित रोहिदास, मिडफिल्डर मनप्रीत सिंह, चिंगलेनसाना सिंह, सुमित, विवेक सागर प्रसाद, फॉरवर्ड आकाशदीप सिंह, एस. व्ही. सुनील, गुरजंत सिंह, मनदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, दिलप्रीत सिंह.सरदार, रमणदीप वेगवेगळ्या कारणांनी संघाबाहेर : भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी सांगितले, की अनुभवी खेळाडू सरदार सिंह हा कडवी स्पर्धा आणि रमणदीप सिंग हा खराब खेळामुळे संघाच्या बाहेर आहे. भारताला स्पर्धेत लय बनवण्यासाठी पाकिस्तानविरोधातील सामन्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी श्रीजेशचे पुनरागमन, सरदार सिंहला विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 4:25 AM