मुंबई : भारताची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री हिने जबरदस्त पुनरागमन करताना महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या नवव्या फेरीत विजयी कामगिरी केली. बेल्जियमच्या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर अॅना झोझुलिया हिला पराभवाचा धक्का देत श्रीजाने ५ गुणांसह सातव्या स्थानी झेप घेतली.अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या (एआयसीएफ) मान्यतेने आणि इंडियन चेस स्कूल व साऊथ मुंबई चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने चेंबूर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत श्रीजाने चौथ्या, पाचव्या व सहाव्या असे सलग तीन विजय नोंदवत जबरदस्त आगेकूच केली होती.मात्र यानंतर सातव्या व आठव्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने स्पर्धा क्रमवारीत ती मागे पडली. त्यामुळे महत्त्वपूर्ण बनलेल्या नवव्या फेरीतील लढतीत श्रीजाला विजय आवश्यक बनला होता आणि तिने अपेक्षित कामगिरी करताना शानदार विजय मिळवत आगेकूच केली.श्रीजाने याआधी महिला आय.एम. वंतिका अग्रवाल (भारत), महिला आय. एम. आकांक्षा हगवणे (भारत) आणि महिला फिडे मास्टर दिव्या देशमुख (भारत) यांना पराभूत केले होते. अन्य लढतीत आकांक्षाने आपल्याच देशाच्या दिव्या देशमुखचा पराभव करत व्हिएतनामच्या महिला ग्रँडमास्टर थि किम फुंग वो हिच्यासह प्रत्येकी ५.५ गुणांची कमाई करत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
श्रीजा शेषाद्रीचे जबरदस्त पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 4:58 AM