कोलंबो : सलामीवीर तमिम इक्बालच्या शानदार ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान श्रीलंकेवर ६ विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर बांगलादेशने दोन कसोटी सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.तमिमने २२वे कसोटी अर्धशतक झळकावत बांगलादेशच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्याने १२५ चेंडूत ७ चौकार व एक षटकार ठोकताना ८२ धावांची खेळी केली. शिवाय शब्बीर रहमानसह तिसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी करुन संघाला विजयी मार्गावर आणले. शब्बीरने ७६ चेंडूत ५ चौकारांसह ४१ धावा काढल्या. यानंतर, कर्णधार मुशफिकर रहीम व अष्टपैलू शाकिब अल हसन यांनी चहापानापर्यंत संघाची वाटचाल कायम राखली. विजयासाठी ३५ धावांची गरज असताना रंगना हेराथने शाकिबला (१५) बाद केले. मुशफिकरने नाबाद २२ धावा काढल्या, तर मोसादेक हुसैन १३ धावा काढून बाद झाल्यानंतर मेहदीने (नाबाद २) विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रीलंकेकडून दिलरुवान परेरा व रंगना हेराथ यांनी अनुक्रमे ५९ व ७५ धावा देऊन प्रत्येकी ३ बळी घेत बांगलादेशला रोखण्याचा प्रयत्न केला.१०० वा कसोटी सामना खेळत असलेल्या बांगलादेशने चमकदार बाजी मारत हा सामना स्वप्नवत ठरवला. तसेच, बांगलादेशने देशाबाहेर केवळ चौथा विजय मिळवला असून श्रीलंकेत तब्बल १८ प्रयत्नानंतर पहिल्यांदा बांगलादेशला यश आले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : श्रीलंका (पहिला डाव) : ११३.३ षटकात सर्वबाद ३३८ धावा आणि (दुसरा डाव) : ११३.२ षटकात ३१९ धावा (दिमुत करुणारत्ने १२६, दिलरुवान परेरा ५०; शाकिब अल हसन ४/७४, मुस्तफिझूर रहमान ३/७८) पराभूत वि. बांगलादेश (पहिला डाव) : १३४.१ षटकात सर्वबाद ३६७ धावा आणि (दुसरा डाव) : ५७.५ षटकात ६ बाद १९१ धावा ( इक्बाल ८२, रहमान ४१; परेरा ३/५९, हेराथ ३/७५)
बांगलादेशचा कसोटीमध्ये श्रीलंकेला हिसका
By admin | Published: March 20, 2017 12:12 AM