हॅमिल्टन : स्टार फलंदाज तिलकरत्ने दिलशानच्या (११६) शतकाच्या बळावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डेत ६ विकेटनी मात केली़ या विजयासह लंकेने ७ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली़ न्यूझीलंडने ब्रँडन मॅक्युलमच्या (११७) आकर्षक शतकाच्या बळावर २४८ धावांचे लक्ष्य उभे केले़ मॅक्युलमने ९९ चेंडूंचा सामना करताना १२ चौकार आणि ५ षटकार लगावले़ किवी संघाकडून रॉस टेलरने ३४, तर मॅट हेन्री याने नाबाद २० धावांचे योगदान दिले़दिलशानने १२७ चेंडूंना सामोरे जाताना १७ चौकार लगावले, तर कुमार संघकारा याने ३८ आणि एंजेलो मॅथ्यूजने नाबाद ३९ धावांची खेळी केली़ या बळावर लंकेने विजयी लक्ष्य ४७़४ षटकांत ४ गड्यांच्या बदल्यात पूर्ण केले़एकापाठोपाठ एक गडी बाद होत असताना दिलशानने एक बाजू लावून धरली़ त्याने दिमूथ करुणारत्नेसह (२१) पहिल्या विकेटसाठी ६४, तर संघकारासोबत त्याने दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचली़ माहेला जयवर्धनेसह (२७) तिसऱ्या विकेटसाठी ४७ आणि एंजेलो मॅथ्यूजसह चौथ्या गड्यासह ७४ धावांची भागीदारी केली़ न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ३४ धावांत २ गडी बाद केले़ अॅडम मिल्ने आणि नॅथन मॅक्युलम यांनी प्रत्येकी १ बळी मिळविला़ याआधी मॅक्युलमने शानदार शतकी खेळी केली़ मात्र, त्याला संघातील खेळाडूंची साथ लाभली नाही़ मॅक्युलम आणि रॉस टेलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली़ मात्र, यानंतर नियमित अंतराने किवी संघाचे गडी बाद होते गेले़ किवी संघाचे तळाचे फलंदाज मॅट हेन्री याने नाबाद २०, अॅडम मिल्ने १९, तर ट्रेंट बोल्ट आणि नॅथन मॅक्युल यांनी प्रत्येकी १३ धावांचे योगदान दिले़ श्रीलंकेकडून सचित्रा सेनानायके आणि रंगना हेराथ यांनी प्रत्येकी २ बळी मिळविले़ (वृत्तसंस्था)
श्रीलंकेची न्यूझीलंडवर मात
By admin | Published: January 16, 2015 4:47 AM