पल्लेकल : वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड आणि फिरकी गोलंदाज नाथन लियॉन यांनी पाठोपाठ धक्के देत श्रीलंकेला पहिल्या कसोटीत पहिल्या दिवशी पहिल्या डावात अवघ्या ११७ धावांत गुंडाळले. आॅस्ट्रेलियाचीही सुरुवात अडखळत झाली. पावसाने हजेरी लावल्याने दिवसाचा खेळ थांबला तेव्हा पाहुण्यांनी ६६ धावांत दोन गडी गमावले होते.डेव्हिड वॉर्नर(००) आणि ज्यो बर्न्स(३) हे पहिल्या चार षटकांत बाद झाले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ(२८)आणि उस्मान ख्वाजा(२५) हे नाबाद आहेत. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी आतापर्यंत ५९ धावांची भागीदारी केली. लंकेकडून नुआन प्रदीप आणि फिरकी गोलंदाज रंगना हेरथ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. त्याआधी हेजलवूडने २१ धावांत तीन, तसेच आॅफ स्पिनर लियॉनने तीन षटकांत १२ धावांत तीन गडी बाद केले. आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा लंकेचा निर्णय चुकीचा ठरविला. लंकेचे पाच फलंदाज दुहेरी आकडा गाठू कले. पहिली कसोटी खेळणाऱ्या धनंजय डिसिल्व्हाने सर्वाधिक २४ धावा केल्या. लंकेची सुरुवात खराब झाली. १८ धावांत त्यांचे तीन गडी बाद झाले. मॅथ्यूज १५ आणि विकेटकिपर फलंदाज दिनेश चांदीमल १५ हे लवकर बाद झाल्याने उपाहारापर्यंत पाच बाद ८४ धावा होत्या. त्यानंतरच्या ६.२ षटकांत आणखी पाच फलंदाज बाद झाले. कुशल परेरा २०, लक्ष्मण संदाकण १९ यांनी थोडाफार प्रतिकार केल्याने संघाला शतकी आकडा गाठता आला. (वृत्तसंस्था)
लंकेचा ११७ धावांत खुर्दा
By admin | Published: July 27, 2016 3:50 AM