दाम्बुला : य जॉर्ज बेली (७०) व मॅथ्यू वेड (४२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने रविवारी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर दोन गडी राखून विजय संपादन केला. श्रीलंकेच्या दिनेश चांदीमलची शतकी खेळी व्यर्थ गेली. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाने २-० अशी आघाडी घेतली.श्रीलंकेने दिनेश चांदीमल (१०२) व शेवटचा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या दिलशान (४२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ४९.२ षटकांत २२६ धावांची मजल मारली. वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने आपल्या पहिल्याच षटकात दनुष्का गुणातिलक (५) याला बोल्ड केले. जोश हेजलवुडने कुसल मेंडिसला (४) तंबूचा मार्ग दाखविता श्रीलंकेची २ बाद २३ अशी अवस्था केली. कारकिर्दीतील अखेरची वन-डे खेळणारा सलामीवीर तिलकरत्ने दिलशान (४२) आणि यष्टिरक्षक फलंदाज चांदीमल (१०२) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. दिलशानला फिरकीपटू अॅडम जंपाने (३-३८) माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. आॅस्ट्रेलियाची डावाची सुरुवात काहीशी डळमळीत झाली. वॉर्नर (१०), मार्श(१) लवकर बाद झाल्यानंतर अॅरॉन फिंच (३०) व जॉर्ज बेली (७०) यांनी डाव सावरला. बेलीचा अडथळा प्रसन्नाने दूर केला. त्यानंतर मॅथ्यू वेड (४२) याने हेड (३६) याच्यासह महत्वपूर्ण भागीदारी केली. आॅस्ट्रेलियाने ४६ षटकात ८ गड्यांच्या मोबदल्यात २२७ धावा करत विजय साकारला. श्रीलंकेच्या मॅथ्यूज, परेरा व अपान्सो यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.दिलशानने ३३० वन-डे सामने खेळताना २२ शतके व ४७ अर्धशतकांच्या मदतीने कारकिर्दीत एकूण १०२९० धावा फटकावल्या. दिलशान माघारी परतला त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत या खेळाडूला मानवंदना दिली. संक्षिप्त धावफलक़श्रीलंका ४९़२ षटकांत सर्वबाद - २२६़ (मेंडिस झे़वॉर्नर गो़ हेजलवूड ४२, चंदीमल १०२, डिसिल्वा १२, परेरा १७,अॅडम जंम्पा ३/३८, स्टार्क २/४२, हेस्टींग्ज २/४१, फॉल्कनर २/४४)़आॅस्ट्रेलिया : ४६ षटकांत ८ बाद २२७ (अॅरॉन फिंच ३०,जॉर्ज बेली ७०,टी.एम. हेड ३६, मार्श वेड ४२, स्टार्क १२. मॅथ्यूज २/३०, अपान्सो २/४४, परेरा २/४५)़
श्रीलंका पराभूत : दिलशानची निवृत्ती
By admin | Published: August 29, 2016 1:50 AM