कोलंबो : भारताला पराभवाचा धक्का देत मालिकेत आघाडी मिळविणारा श्रीलंका संघ महान फलंदाज कुमार संगकाराला त्याच्या कारकीर्दीतील अखेरच्या कसोटी सामन्यात विजयाची भेट देण्यास उत्सुक असून संगकाराची निरोपाची कसोटी संस्मरणीय ठरविण्यासाठी सज्ज आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर असलेला श्रीलंका संघ २० आॅगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या दुसऱ्या आणि संगकाराच्या अखेरच्या कसोटी सामन्यात विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर यजमान संघ संगकाराला विजयाने निरोप देण्यात आणि मालिका विजय साकारण्यात यशस्वी ठरेल. श्रीलंकेतर्फे सर्वाधिक धावा फटकावणारा संगकारा या लढतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. श्रीलंका व भारत या संघांदरम्यान दुसरा कसोटी सामना पी. सारा ओव्हल स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. संगकाराच्या निरोपाच्या कसोटीला भव्य व संस्मरणीय ठरविण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. संगकारा या मैदानावर चमकदार कामगिरी करीत कारकीर्दीचा समारोप करण्यास उत्सुक आहे. येथे अखेरच्या तीन कसोटी सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. त्यात पाकिस्तानविरुद्ध जून महिन्यात खेळल्या गेलेल्या लढतीत तो पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. ३७ वर्षीय संगकारा चांगल्या फॉर्मात आहे. (वृत्तसंस्था)
संगकाराच्या निरोप समारंभासाठी श्रीलंका सज्ज
By admin | Published: August 18, 2015 10:47 PM