ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. ३० - तिस-या व निर्णायक कसोटीत ईशांत शर्माच्या भेदक मा-यामुळे श्रीलंकेचा पहिला डाव २०१ डावांवर आटोपला असून भारताला १११ धावांची आघाडी घेतली आहे. मात्र दुस-या डावात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत भारताची अवस्था ३ बाद २१ धावा अशी झाली आहे.
तिस-या दिवशी ८ बाद २९२ धावांवरुन पुढे खेळताना श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या तळाच्या फलंदाजांना झटपट बाद केले. ईशांत शर्मा ६ तर उमेश यादव ४ धावांवर बाद झाल्याने भारताचा डाव ३१२ धावांवर आटोपला. सलामीवीर चेतेश्वर पुजारा १४५ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेतर्फे धम्मिका प्रशादने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर रंगना हेराथने तीन विकेट घेतल्या.
फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक मा-यापुढे शरणागती पत्कारली सलामीवीर उपूल थरंगा ४, कौशल सिल्वा ३ धावांवर बाद झाले. तर दिनेश चंडिमल २३ आणि अँजेलो मॅथ्यूज १ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ करुणारत्ने व लाहिरु थिरीमानेही स्वस्तात बाद झाल्याने श्रीलंकेची अवस्था ६ बाद ४७ धावा अशी झाली होती. मात्र त्यानंतर कुशल परेराने ५५ धावांची खेळी करत लंकेचा डाव सावरला. धम्मिका प्रसाद जायबंदी झाल्याने तो माघारी परतला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रंगना हेराथने ४९ धावांची खेळी करत परेराला मोलाची साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर प्रसाद पुन्हा मैदानात आला. तो २७ धावांवर बाद झाला. भारतातर्फे ईशांत शर्माने पाच विकेट घेतल्या. ईशांतने कसोटीत पाच विकेट घेण्याची ही सातवी वेळ आहे. स्टुअर्ट बिन्नी व अमित मिश्राने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. उमेश यादवने एक विकेट घेतली.
दुस-या डावात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ लोकेश राहुल २ तर अजिंक्य रहाणे ४ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद २१ अशी झाली.पावसामुळे तिस-या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. त्यामुळे आघाडी घेऊनही भारताचे सलामीचे फलंदाज स्वस्तात माघारी परतल्याने सामन्याला कलाटणी मिळाली आहे.