जिलोंग : असेला गुणरत्नेच्या (८४*) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकाने दुसऱ्या टी२० सामन्यात आॅस्टे्रलियाविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. आॅस्टे्रलियाने दिलेल्या १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या चेंडूवर २ फलंदाज शिल्लक ठेवत १७६ धावा काढल्या. गुणरत्नेने ओस्टे्रलियाई गोलंदाजी फोडून काढत केवळ ४६ चेंडूत नाबाद ८४ धावांचा तडाखा दिला. त्याने सहा चौकारांसह ५ षटकारांची आतषबाजी केली.संक्षिप्त धावफलक : आॅस्टे्रलिया : २० षटकात सर्वबाद १७३ धावा (मोइसेस हेन्रिक्स नाबाद ५६, मायकल क्लिंगर ४३; नुवान कुलसेखरा ४/३१) पराभूत वि. श्रीलंका : २० षटकात ८ बाद १७६ धावा (असेला गुणरत्ने नाबाद ८४, चमारा कपुगेदरा ३२; अँड्रयू टाय ३/३७). विशेष म्हणजे याआधी झालेल्या पहिल्या टी२० सामन्यातही चमारा कपुगेदराने अखेरच्या चेंडूवरच चौकार लगावत संघाला विजयी केले होते. दखल घेण्याची बाब म्हणजे आॅस्टे्रलियन जमिनीवर ५ टी२० सामने खेळताना अद्याप एकही पराभव स्वीकारलेला नाही.लंकेला अखेरच्या चार षटकात ५२ धावांची गरज होती. परंतु, गुणरत्नेने तुफानी हल्ला करताना आॅस्टे्रलियन गोलंदाजांना जबरदस्त चोपले. त्याने मोईजेस हेन्रिक्सला सलग तीन षटकार, एक चौकार आणि त्यानंतर अँड्रयू टाय टाकत असलेल्या अंतिम षटकात दोन चौकार व एक षटकार ठोकला. यानंतर मालिकेतील अखेरच्या टी२० सामन्यातही बाजी मारुन कांगारुंना क्लीन स्वीप देण्याचा लंकेचा प्रयत्न असेल. दरम्यान, या पराभवामुळे आॅसी प्रचंड नाराज असतील. कारण, त्यांनी लंकेची एकवेळ ५ षटकात ५ बाद ४० धावा अशी अवस्था केली होती. परंतु, गुणरत्नेने धामाकेदार फलंदाजी केली आणि कपुगेदरानेही ३२ चेंडूत ३२ धावा करुन संघाला विजयी केले. याआधी हेन्रिक्सने (५६*) आपले पहिले टी२० अर्धशतक झळकावून संघाला मजबूत धावसंख्या उभारुन दिली. (वृत्तसंस्था)
श्रीलंकेने कांगारुंना धुतले
By admin | Published: February 20, 2017 12:30 AM