श्रीलंकेचा हा खूप मोठा विजय आहे. श्रीलंकेने ज्याप्रमाणे भारतावर मात केली त्याचा विचार देखील कुणी केला नव्हता. या दोन्ही संघाची तुलना केली असता दोन्ही संघांमध्ये मोठे अंतर होते. भारताचा संघ बलाढ्य मानला जात होता. भारताने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास देखील वाढला होता. खेळाडूंची कामगिरी देखील चांगली होती. श्रीलंकेचा विचार केला तर त्यांचा संघ पराभूत होऊन या सामन्यात खेळण्यासाठी आला होता. प्रमुख खेळाडूंची कामगिरी चांगली होत नव्हती. अँजेलो मॅथ्यूज्ने या सामन्यातून पुनरागमन केले. त्यामुळे कुठेही वाटले नव्हते की श्रीलंकेचा संघ या सामन्यात जिंकेल. मात्र क्रिकेट आणि खेळात काहीही होऊ शकते. श्रीलंकेच्या खेळाची दाद द्यावी लागेल. भारताने मोठी धावसंख्या उभारल्यानंतर देखील त्यांनी अजिबात दडपण घेतले नाही. त्यानंतरही त्यांनी या धावांचा पाठलाग केला. तो सर्वोत्तम होता. काही गोष्टी देखील त्यांच्या बाजूने घडल्या. टॉस जिंकणे तसेच पाऊस देखील आला नाही. त्यांचा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अगदी योग्य ठरला. पूर्ण सामन्यात त्यांनी पाठलाग करण्यासाठी जी रणनीती अवलंबली ती नक्कीच कौतुकास्पद आहे. मला त्यांच्या खेळात कोणतेही दडपण जाणवले नाही. जाणवला तो त्यांचा उत्साह, जोश, त्यांनी केलेले नियोजन आणि एक सर्वोत्तम प्रेरणा.श्रीलंकेच्या खेळाडूंनी एक प्रकारे धैर्य मिळवले. भारताच्या शिखर धवन याने केलेले शतक, रोहित शर्माची चांगली धावसंख्या या भारताच्या जमेच्या बाजू होत्या. फॉर्ममध्ये असलेले विराट कोहली आणि युवराज सिंह हे धावा करू शकले नाही. तरीही भारताने मोठी धावसंख्या उभारली त्याचे श्रेय शिखर आणि रोहित यांच्या भागीदारीला द्यायला हवे. त्यानंतर महेंद्र सिंह धोनी याने चांगला खेळ केला. त्यामुळेच श्रीलंकेला धैर्य मिळाले. त्यामुळे श्रीलंकेने ३०-३५ षटकांपर्यंत दोनपेक्षा गडी बाद होऊ न देण्याचे नियोजन केले. अशी परिस्थिती निर्माण केल्यास मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करता येतो. वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगल्या धावा केल्यास मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता येतो. श्रीलंकेकडे देखील मोठे फटके खेळणारे खेळाडू आहेत. कुशाल परेरा, कुशाल मेंडिस, गुणथलिका यांची फलंदाजी अप्रतिम होती. मला अँजेलो मॅथ्यूज्चे विशेष कौतुक वाटते. त्याने कर्णधार म्हणून पुनरागमन केले. त्याने या सामन्यात अतिशय उत्तम नेतृत्व केले. त्याची फलंदाजी देखील उत्कृष्ट होती. त्याने संघाला कर्णधार आणि फलंदाज या दोन्ही भूमिकेतून अतिशय चांगले सांभाळले. भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला असता गोलंदाजीत भारत मागे पडला. या सपाट खेळपट्टीवर धावांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे होते. मात्र तेच भारताला करता आले नाही. फिरकीत रवींद्र जाडेजाचा दिवस चांगला नव्हता. त्याने ६ षटकांतच ५२ धावा दिल्या आणि तेथूनच भारताच्या हातून सामना निसटला, असे मला वाटते.-अयाझ मेमन (संपादकीय सल्लागार)