ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडने विश्वचषकाच्या सलामीला शनिवारी गत उपविजेत्या लंकेची ९८ धावांनी शिकार केली. न्यूझीलंडच्या ३३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लंकेचा डाव ४६.१ षटकांत सर्व बाद २३३ धावांत आटोपला. लंकेकडून कुणीही फलंदाज फारसा चमकला नाही. सलामीचा लाहिरू थिरिमाने याने सर्वाधिक ६५; तसेच कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने ४६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून कोरी अॅण्डरसन, डॅनियल व्हेट्टोरी, टीम साऊदी, अॅडम मिल्ने आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. व्हेट्टोरीने दहा षटकांत केवळ ३४ धावा दिल्या. त्याआधी यजमान संघाकडून अॅण्डरसनने ७५, कर्णधार ब्रँडन मॅक्युलम ६५, केन विलियम्सन ५७ आणि मार्टिन गुप्तिल ४६ धावा यांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ६ बाद ३३१ धावा उभारल्या. पाठलाग करणाऱ्या लंकेकडून थिरिमाने-दिलशान यांनी सलामीला १३ षटकांत ६७ धावा ठोकल्या. अनुभवी व्हेट्टोरीने दिलशानचा आपल्याच चेंडूवर झेल घेत पहिला धक्का दिला. कुमार संगकाराने ३९ धावा केल्या. यादरम्यान त्याने विश्वचषकात हजार धावा पूर्ण केल्या; तसेच वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. व्हेट्टोरीने अनुभवी माहेला जयवर्धनेला भोपळा न फोडू देता रोंचीकडे झेल देण्यास बाध्य केले. संगकारा पायचित झाल्याने लंकेची स्थिती ४ बाद १२९ झाली होती. मिल्नेने करुणारत्ने १४ आणि मेंडिस ४ यांना एकाच षटकात टिपले. ३३ व्या षटकात कुलसेकरा बाद झाला. लंकेला दहा षटकांत विजयासाठी १२३ धावांची गरज होती; त्याआधी नाणेफेक गमाविल्यानंतर फलंदाजी मिळालेल्या न्यूझीलंडकडून मॅक्युलम-गुप्तिल यांनी १५.५ षटकांत १११ धावांची सलामी दिली. या जोडीने लसिथ मलिंगाच्या चार षटकांत ४२ धावा वसूल करताच त्याला हटविण्यात आले. त्याने दहा षटकांत एकूण ८४ धावा मोजल्या. मॅक्युलम व गुप्तिल बाद झाल्यानंतर अॅण्डरसनने ४६ चेंडू टोलवित आठ चौकार, दोन षटकारांसह संघाच्या ३०० धावा पूर्ण केल्या. त्याने रोंचीसोबत (नाबाद २९) सहाव्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. लंकेकडून मेंडिस आणि लकमल यांनी प्रत्येकी दोन; तर हेराथ आणि कुलसेकरा यांनी एकेक गडी बाद केला.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकन्यूझीलंड : मार्टिन गुप्तिल झे. संगकारा गो. लकमल ४९, मॅक्युलम झे. मेंडीस गो. हेरथ ६५, केन विलियम्सन झे. करुणारत्ने गो. मेंडीस ५७, रॉस टेलर यष्टिचीत संघकारा गो. मेंडीस १४, ग्रांट इलियट झे. तिरिमाने गो. लकमल २९, कोरी अँडरसन झे. लकमल गो. कुलसेकरा ७५, ल्यूक रोंची नाबाद २९, अवांतर : १३, एकूण : ५० षटकांत ६ बाद ३३१ धावा. गोलंदाजी : कुलसेकरा ८-०-७८-१, मलिंगा १०-०-८४-०, मॅथ्यूज ६-०-२८-०, हेरथ ९-०-३७-१, दिलशान ५-०-३५-०, लकमल १०-०-६२-२, मेंडीस २-०-५-२. श्रीलंका : लाहिरू थिरिमाने त्रि.गो. बोल्ट ६५, तिलकरत्ने दिलशान झे. आणि गो. व्हेट्टोरी २४, कुमार संगकारा पायचित गो. बोल्ट ३९, माहेला जयवर्धने झे. रोंची गो. व्हेट्टोरी ०, दिमूथ करुणारत्ने त्रि.गो. मिल्ने १४, अँजेलो मॅथ्यूज झे. व्हेट्टोरी गो. साऊदी ४६, जीवन मेंडीस झे. रोंची गो. मिल्ने ४, नुवान कुलसेकरा झे. इलियट गो. अँडरसन १०, रंगना हेरथ झे. मिल्ने गो. अँडरसन १३, लसिथ मलिंगा झे. रोंची गो. साऊदी ०, सुरंगा लकमल नाबाद ७, अवांतर : ११, एकूण : ४६.१ षटकांत सर्व बाद २३३ धावा. गोलंदाजी : साऊदी १०-१-४३-२, बोल्ट १०-०-६४-२, मिल्ने १०-०-५६-२, व्हेट्टोरी १०-०-३४-२, इलियट २-०-११-०, विलियम्सन १-०-७-०, अँडरसन ३.१-०-१८-२.
न्यूझीलंडकडून लंकेची शिकार
By admin | Published: February 14, 2015 11:28 PM