नवी दिल्ली : भारतीय कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनामुळे देशातील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणारे खेळाडू आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जंतरमंतरवर आंदोलन केले. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. तीन दिवस गोंधळ झाला आणि अखेर क्रीडा मंत्रालयाला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. पण, हे पहिल्यांदाच घडले नाही. खेळाडूंना हक्क मिळवून देण्यासाठी भारतात यापूर्वीही अशाच प्रकारचे आंदोलन झाले आहे. दिल्लीतील राजपथवर 52 वर्षांपूर्वी असेच एक आंदोलन झाले होते. त्याचा परिणाम दिसून आला आणि या निषेधामुळे भारताला असा खेळाडू मिळाला, जो आशियाई चॅम्पियनही झाला. ही स्टोरी आहे भारताचे स्टार अॅथलीट श्रीराम सिंह यांची.
श्रीराम सिंह हे भारतातील सर्वात यशस्वी मिडल डिस्टेंस (400 मीटर आणि 800 मीटर) अॅथलेटिक्सपैकी एक आहेत. 1968 मध्ये ते राजपुताना रायफल्समध्ये सामील झाले. जिथे अॅथलेटिक्स प्रशिक्षक इलियास बाबर यांनी श्रीराम यांना 400 आणि 800 मीटर शर्यतीत सहभागी होण्यास सांगितले. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर खूप यश मिळवले. 1970 मध्ये बँकॉक येथे आशियाई क्रीडा स्पर्धा होणार होत्या. श्रीराम हे या स्पर्धेत सहभागी होऊन पदक आणणार, याची सर्वांना खात्री होती. मात्र, खेळाडूंची नावे जाहीर करताना श्रीराम यांच्या नावाचा समावेश नसल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
राजपथवर झाला होता निषेधश्रीराम यांची कामगिरी ज्यांना माहीत होती, त्यांना हे आवडले नाही. ज्येष्ठ पत्रकार नॉरिस प्रीतम यांनी एका टीव्ही कार्यक्रमात सांगितले की, दिल्लीचे काही स्थानिक खेळाडू श्रीराम यांच्या समर्थनार्थ पुढे आले. त्यांनी काळी पट्टी बांधून आणि राजपथवर मॅरेथॉन केली. दुसऱ्या दिवशी ही बातमी वर्तमानपत्रात ठळकपणे प्रसिद्ध झाली. सरकारने याची दखल घेतली आणि त्यानंतर श्रीराम यांना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले. श्रीराम यांनी आपल्या समर्थकांना निराश केले नाही. त्यांनी 800 मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले. ही त्यांच्या शानदार कारकिर्दीची फक्त सुरुवात होती.
भारताला जिंकून दिले अनेक पदक!यानंतर, श्रीराम यांनी 1974 मध्ये तेहरान येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 800 मीटरमध्ये सुवर्ण आणि 4X400 मीटर रिलेमध्ये रौप्य पदक जिंकले. तसेच, 1978 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ते 800 मीटर शर्यतीत चॅम्पियन बनले आणि पुन्हा एकदा रिलेमध्ये रौप्यपदक जिंकले. याशिवाय, 1976 च्या मॉन्ट्रियल ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी 800 मीटरच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पात्रता फेरीत त्यांनी 1:45.86 अशी वेळ नोंदवून 14 वर्षे टिकून असलेला आशियाई विक्रम केला. त्याचवेळी त्यांचा हा राष्ट्रीय विक्रम 42 वर्षे भारतात राहिला. 2018 मध्ये जिनसन जॉन्सनने त्यांचा विक्रम मोडला होता.