मेलबोर्न : माजी भारतीय खेळाडू श्रीधर श्रीराम क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे सल्लागार नियुक्त झाले आहेत. याशिवाय आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी यालादेखील संयुक्तपणे ही जबाबदारी सोपविण्यात आली. श्रीराम आणि हसी हे पुढील वर्षी भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात राष्ट्रीय संघाला मदत करतील. आॅस्ट्रेलियाला टी-२० ही आयसीसीची एकमेव स्पर्धा जिंकता आलेली नाही.मार्च-एप्रिलमध्ये भारतात विश्वचषकाचे आयोजन होईल. यादरम्यान श्रीराम आॅस्ट्रेलिया संघात असतील. द. आफ्रिकेत आॅस्ट्रेलिया संघ अॅरोन फिंचच्या नेतृत्वात तीन टी-२० सामने खेळणार असून, या वेळी श्रीराम संघाचे सल्लागार म्हणून सोबत असतील. त्यानंतर विश्वचषकाच्या पहिल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत हसीदेखील संघासोबत असेल. सीएचे कार्यकारी महाव्यवस्थापक (कामगिरी) पॅट होवार्ड म्हणाले, की भारतात आगमनाआधी आम्ही द. आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२० सामने खेळणार आहोत. भारतातील परिस्थितीनुरूप संघ तयार करण्यासाठी श्रीराम यांची मदत होईल. आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघ भारत दौऱ्यावर असताना श्रीराम यांची संघाला मदत झाली होती. ते आमच्यासोबत गेली काही वर्षे जुळले असल्याने संघासोबत ताळमेळ साधण्यात त्यांना अडचण जाणार नाही. आयपीएलमधील दिल्ली डेअरडेव्हिल्सचे सहायक कोच असलेले श्रीराम हे २००० ते २००४ या काळात भारताकडून आठ वन डे खेळले आहेत. (वृत्तसंस्था)
श्रीधर श्रीराम क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे सल्लागार
By admin | Published: December 17, 2015 1:23 AM