ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 18 - भारतीय बॅडमिंटनपटू किंदबी श्रीकांतनं इंडोनेशिया सुपर सीरिज प्रीमिअरच्या पुरुष एकेरीत जेतेपद पटकावलं आहे. किंदबी श्रीकांतनं 37 मिनिटे चाललेल्या या स्पर्धेत जपानच्या सकाईवर 21-11, 21-19 अशा दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला आहे.
तत्पूर्वी के. श्रीकांत याने सुरेख कामगिरी करताना शनिवारी येथे जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू कोरियाच्या सोन वॉन हो याच्यावर संघर्षपूर्ण उपांत्य फेरीत सनसनाटी विजय मिळवताना इंडोनेशिया सुपर सीरीज प्रीमिअरच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याच वेळी या स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवणाऱ्या एच. एच. प्रणॉय याला मात्र पराभवाचा सामना करावा लागला होता. इंडोनेशिया सुपर सीरीज प्रीमिअरच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत गुंटूरच्या 24 वर्षीय श्रीकांतने एक तास आणि 12 मिनिटे रंगलेल्या सामन्यात 21-15, 18-21 आणि 24-22, असा विजय नोंदवला आहे. गेल्या दोन दिवसांत ऑलिम्पिक रौप्यपदकप्राप्त ली चोंग वेई आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या चेन लोंग यांच्यावर धक्कादायक विजयाची नोंद करणाऱ्या जागतिक क्रमवारीतील २५ व्या मानांकित प्रणॉयकडून खूप अपेक्षा होत्या; परंतु या भारतीय खेळाडूला जपानच्या काजुमासा सकाईविरुद्ध 21-17, 26-28, 18-21 ने पराभवाचा सामना करावा लागला.