जकार्ता : भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने रविवारी येथे अंतिम सामन्यात जपानचा क्वॉलिफायर काजुमासा साकाई याच्यावर सरळ गेम्समध्ये विजय नोंदवताना इंडोनेशिया ओपनचे पुरुष एकेरीचे विजेतेपद आपल्या नावावर केले. त्याचे हे सुपर सीरीजचे तिसरे विजेतेपद ठरले.एप्रिलमध्ये सिंगापूर ओपनच्या फायनल्समध्ये पोहोचणारा जगातील २२ व्या क्रमांकावरील खेळाडू श्रीकांतने ४७ व्या रँकिंगच्या साकाई याचा अवघ्या ३७ मिनिटांत २१-११, २१-१९, असा पराभव करताना ७५,000 डॉलर बक्षीस रकमेचा धनादेश आपल्या नावे केला. श्रीकांतने २0१४ मध्ये चायना सुपर प्रीमिअर आणि २0१५ मध्ये इंडिया सुपर सीरीज जिंकली होती. श्रीकांतने संयमी खेळ करताना आपल्या प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखले. त्याने अचूक परतीचे फटके मारले आणि प्रतिस्पर्ध्याला नमवण्यासाठी योग्यवेळी स्मॅश मारणे सुरू ठेवले. त्याला जोरदार हवा असणाऱ्या कठीण परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागला. कारण त्याचे सुरुवातीचे रिटर्न बाहेर गेले. याच परिस्थितीचा श्रीकांतच्या प्रतिस्पर्ध्यालाही सामना करावा लागला आणि त्याने केलेल्या चुकांचा फायदा भारतीय खेळाडूने घेत ६-४ अशी आघाडी घेतली. ब्रेकपर्यंत त्याने आघाडी ११-८ अशी केली.ब्रेकनंतर श्रीकांतने आपले वर्चस्व कायम ठेवले. त्याचे नेट ड्रिबल्स साकाई याच्या तुलनेत सरस होते. या भारतीय खेळाडूने १९-११ अशी आघाडी घेतली आणि आणखी दोन गुण घेत हा गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये साकाईने आक्रमक पावित्रा अवलंबला व त्याने ७-३ अशी आघाडी घेतली आणि नेटजवळ बॅकहँड रिटर्नच्या मदतीने त्याने ब्रेकपर्यंत त्याची आघाडी ११-६ अशी केली. त्यानंतर श्रीकांतनेही आक्रमक खेळ करताना शक्तिशाली स्मॅश मारताना १३-१३ अशी बरोबरी साधली. त्यानंतरही दोघांत १९-१९ अशी बरोबरी झाली; परंतु श्रीकांतने दोन अप्रतिम स्मॅश मारत विजेतेपद आपल्या नावावर करीत जल्लोष साजरा केला.साकाईबद्दल श्रीकांत म्हणाला, ‘तो खूप चांगला खेळत होता. विशेषत: दुसऱ्या गेममध्ये आणि मला वाटते ६-११ पिछाडीवरून मुसंडी मारताना १३-१३ अशी बरोबरी साधली जे की कलाटणी देणारी ठरले. माझ्या प्रशिक्षकाचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान राहील. कारण जेव्हापासून ते आले मी सिंगापूर फायनल्समध्ये पोहोचलो होतो आणि मी ही स्पर्धा जिंकली होतीे.’ (वृत्तसंस्था)विश्व चॅम्पियनशिपआधीचा विजय आत्मविश्वास उंचावणारा : श्रीकांतजकार्ता : भारताचा आघाडीचा खेळाडू किदाम्बी श्रीकांतने रविवारी येथे इंडोनेशिया सुपर सीरीज प्रीमिअरमध्ये मिळवलेले विजेतेपद विश्व चॅम्पियनशिपआधी आत्मविश्वास उंचावणारे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. विजेतेपद पटकावल्यानंतर तो म्हणाला, ‘मला वाटते की, हा शानदार गेम होता. मी पहिल्या गेममध्ये चांगली सुरुवात केली; परंतु दुसऱ्या गेममध्ये तो चांगला खेळत होता आणि त्याने ब्रेकपर्यंत ११-६ अशी आघाडी घेतली होती; परंतु मला एकूणच माझा गेम चांगला होता असे वाटते आणि आक्रमण हे माझ्यासाठी चांगले राहिले. हा विजय माझ्यासाठी खूप आवश्यक होता. सिंगापूर ओपन फायनल्समध्ये पराभूत झाल्यानंतर येथे एक अन्य फायनलमध्ये पोहोचणे माझ्यासाठी चांगली बाब होती. मी खूप दिवसांआधी पहिली सुपर सीरीज स्पर्धा जिंकली होती. मी पुढील आठवड्यात आॅस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. ही विश्व चॅम्पिअनशिपआधी माझी अखेरची स्पर्धा आहे. मी त्यासाठी सज्ज आहे. ही विश्वचॅम्पियनशिपच्या आधी माझ्यासाठी आत्मविश्वास उंचावणारी आहे. मी माझे सर्वस्व पणाला लावेन आणि मला चांगल्या निकालाची आशा आहे.’पंतप्रधानांनी केले श्रीकांतचे अभिनंदन...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतला इंडोनेशिया ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावल्याबद्दल अभिनंदन केले आहे. जागतिक क्रमवारीतील २२ व्या क्रमांकावरील खेळाडूने अंतिम सामन्यात जपानच्या काजुमासा साकाईचा पराभव केला. मोदी यांनी टिष्ट्वटरवर लिहिले, ‘अभिनंदन किदाम्बी. आम्ही इंडोनेशिया ओपन सुपर सीरीजच्या विजयाबद्दल खूप आनंदी आहोत.’भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हेमंत विश्व सरमा यांनीदेखील श्रीकांतचे अभिनंदन केले. ‘अभिनंदन श्रीकांत. तू आम्हा सर्वांना गौरवान्वित केले. विजयावर तुला बीएआयकडून पाच लाख रुपये रोख पुरस्कार.’ भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने लिहिले, ‘अभिनंदन श्रीकांत. इंडोनेशिया ओपन जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू. एक किल्ला जिंकला.’ एच.एस. प्रणय आणि अजय जयराम यांनीदेखील श्रीकांतचे टिष्ट्वटरवर अभिनंदन केले.
श्रीकांत चॅम्पियन
By admin | Published: June 19, 2017 1:02 AM