ऑनलाइन लोकमत
मुल्हेम(जर्मनी), दि. 03 - आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत हा जर्मन ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होताच बाहेर पडला. पराभूत होण्याआधी श्रीकांतने चीनचा आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग याच्याविरुद्ध जबरदस्त संघर्ष केला. त्याच्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
१२ व्या स्थानावर असलेला श्रीकांत याला काल ४७ मिनिटांच्या खेळात पुरुष एकेरीत दोन वेळेचा विश्वविजेता व आॅल इंग्लंड चॅम्पियन चेन लोंग याने १९-२१, २०-२२ अशा फरकाने पराभूत केले. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेल्या श्रीकांतने दोन्ही गेममध्ये १२-६, १६-१२ अशी आघाडी संपादन केली होती. पण अखेर दोन्ही गेम गमविण्याची वेळ आल्याने सामना घालवावा लागला. दुस-या फेरीत शुभंकर डे आणि हर्षित अग्रवाल हे देखील आपापल्या लढतीत पराभूत झाले.