हैदराबाद : सलग दोन सुपर सिरिज बॅडमिंटन विजेतेपद पटकावून पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल १० मध्ये स्थान निश्चित झाल्यानंतर स्टार शटलर किदाम्बी श्रीकांतने आॅगस्ट महिन्यात होणारी वर्ल्ड चॅम्पिअयनशीप स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला आहे. इंडोनेशिया आणि आॅस्टे्रलिया ओपन जिंकून हैदराबादला परतल्यानंतर श्रीकांतने आपल्या पुढील वाटचालीची माहिती दिली. दरम्यान, यावेळी श्रीकांतने राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपिचंद यांच्यासह आपल्या यशाचा आनंद साजरा केला. यावेळी श्रीकांतच्या कुटुंबियांचीही उपस्थिती होती. मायदेशी परतल्यानंतर प्रसारमाध्यंमाशी बोलताना श्रीकांतने विजेतेपदाच्या निर्धारानेचे आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार असल्याचे सांगितले. श्रीकांतने म्हटले की, ‘जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये पुन्हा प्रवेश करणे चांगली बाब आहे. मात्र, मी अव्वल दहामध्ये येण्यासाठी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला नव्हता. मी जिंकण्यासाठीच या स्पर्धांमध्ये खेळलो होतो. शिवाय जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही नक्कीच विजेतेपद मिळवण्यासाठीच मी खेळेल. सध्या मी केवळ याच गोष्टीचा विचार करत असून रँकिंगचा विषय माझ्या डोक्यातही नाही.’ टाचेच्या दुखापतीतून सावरल्यानंतर श्रीकांतने जबरदस्त पुनरागमन करताना मागील काही आठवड्यांमध्ये शानदार यश मिळवले आहे. श्रीकांत पुढे म्हणाला, ‘मागील दोन आठवडे शानदार राहिले. केवल माझ्यासाठीच नाही, तर एच. एस. प्रणॉय आणि साई प्रणीतसाठीही शानदार ठरले. प्रणॉयने खरंच चांगला खेळ दाखवला आणि सलग सामन्यांमध्ये चोंग वेई आणि चेन लाँग या दिग्गज खेळाडूंना नमवले. याआधी कोणत्याही खेळाडूला अशी लक्षवेधी कामगिरी करण्यात यश आले नव्हते.’ (वृत्तसंंस्था)
वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकण्याचा किदाम्बी श्रीकांतचा निर्धार
By admin | Published: June 28, 2017 12:52 AM