हुएलवा (स्पेन) : जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय पुरुष ठरलेल्या किदाम्बी श्रीकांतला अखेर रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सरळ दोन गेममध्ये सिंगापूरच्या लोह कीन यू याच्याविरुद्ध पराभव झाल्याने श्रीकांतचे सुवर्ण हुकले. असे असले तरी श्रीकांतचे रौप्य भारतासाठी ऐतिहासिक ठरले.
श्रीकांतला ४३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात यू विरुद्ध १५-२१, २०-२२ असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने ९-३ अशी मोठी आघाडी घेतली होती. मात्र, यू याने शानदार पुनरागमन करताना श्रीकांतला मागे टाकले. पहिला गेम श्रीकांतने केवळ १६ मिनिटांमध्ये गमावला. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने शानदार झुंज दिली. त्याने प्रत्येक गुणासाठी यू याला झुंजवले. परंतु, संधी मिळताच यूने मिळवलेली आघाडी भक्कम करत बाजी मारली. सिंगापूरच्या यू याने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनला नमवत सर्वांनाच चकित केले होते. श्रीकांतने शनिवारी भारताच्याच युवा लक्ष्य सेनला नमवत अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला पुरुष शटलर ठरला. स्पर्धा इतिहासात भारताला पुरुष गटात पहिल्यांदाच रौप्य मिळाले आहे.