चेन्नई : स्लोवाकियाचा २४ वर्षीय जोसेफ कोवालिकने चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी धक्कादायक निकाल नोंदवताना क्रोएशियाचा स्पर्धेतील अग्रमानांकीत खेळाडू मरिन सिलिचला नमवले. विशेष म्हणजे जोसेफने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत जागा मिळवली होती. आपल्या कारकिर्दीमध्ये केवळ दोन चॅलेंजर जेतेपद पटकावलेल्या जोसेफने ग्रँडस्लॅम विजेत्या सिलिचला चांगलेच झुंजवत अखेपर्यंत दबावाखाली ठेवले. जागतिक क्रमवारीत ११७व्या स्थानी असलेल्या जोसेफने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावरील सिलिचविरुध्द नियंत्रित खेळ करताना ७-६, ५-७, ७-५ असा विजय मिळवला. २ तास ४८ मिनिटांमध्ये रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात दबावाखाली सिलिचकडून अनेक चुका झाल्या. स्पर्धा इतिहासात २०१० सालानंतर पहिल्यांदाच अव्वल मानांकीत खेळाडू पराभूत झाला आहे. (वृत्तसंस्था)
अग्रमानांकीत सिलिचचा धक्कादायक पराभव
By admin | Published: January 05, 2017 2:15 AM