लंडन : रशियाच्या डेनिल मेद्वेदेव याने यंदाच्या विम्बल्डनमध्ये पहिल्या खळबळजनक निकालाची नोंद करताना जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिंकाला नमवले. यामुळे वावरिंकाच्या करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याच्या स्वप्नाला धक्का बसला आहे. तसेच, रॉजर फेडरर व नोवाक जोकोविच या दिग्गजांनी विक्रमी विजयांसह आपल्या मोहिमेची सकारात्मक सुरुवात केली.आॅल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर २ तास १३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात मेद्वेदेवने बलाढ्य वावरिंकाचे आव्हान ६-४, ३-६, ६-४, ६-१ असे संपुष्टात आणले. डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीसह खेळताना वावरिंकाने पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर दुसरा सेट जिंकत पुनरागमन केले होते. परंतु, दुखापत आणखी उफाळून आल्याने वावरिंकाच्या खेळावर परिणाम झाला. दुसरीकडे, फेडरर व जोकोविच यांनी नवा कीर्तिमान विक्रम रचत विजयी सलामी दिली. प्रतिस्पर्धी खेळाडूंनी अर्धवट सामना सोडल्याने दोघांनाही दुसरी फेरी गाठण्यात काहीच अडचण आली नाही. फेडररच्या धडाक्यापुढे युक्रेनच्या अलेक्झांद्र डोगलोपोलोव याने माघार घेतली तेव्हा फेडरर ६-३, ३-० असा आघाडीवर होता. दुसरीकडे, जोकोविच मार्टिन क्लिजानविरुद्ध ६-३, २-० असा आघाडीवर असताना मार्टिनने सामना सोडला. फेडररने यासह विम्बल्डनमध्ये आपला ८५ वा विजय नोंदवताना जिम्मी कॉर्नर्सचा विक्रम मोडला. जोकोविचनेही आपला २३४ वा ग्रँडस्लॅम सामना जिंकताना फेडररनंतर दुसरा क्रमांक पटकावला. कॅनडाचा सहाव्या मानांकित राओनिकने अपेक्षित विजयी कूच करताना जर्मनीच्या जॅन-लेनार्ड स्ट्रफ याचा ७-६(७-५), ६-२, ७-६(७-४) असा पराभव केला. डेव्हिड फेररनेही चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात बाजी मारताना फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटला ६-३, ६-४, ५-७, ६-२ असे नमवले. (वृत्तसंस्था)मिनेलाने वेधले लक्ष...महिला गटाच्या पहिल्या फेरीत लग्जमबर्गच्या मैंडी मिनेला हिने टेनिसविश्वाचे लक्ष वेधले. साडेचार महिन्यांची गर्भवती असूनही विम्बल्डनची पहिली फेरी खेळताना मिनेला हिने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिले. सामन्यादरम्यान तिने घातलेल्या सैल कपड्यांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले. सामना झाल्यानंतर मिनेला हिने आपण आई बनणार असल्याचे सांगतानाच यंदाच्या मोसमात विम्बल्डन माझी अखेरची स्पर्धा असेल, असे म्हटले. दरम्यान, सलामीला मिनेला इटलीच्या फ्रान्सेस्का शियावोनविरुद्ध १-६, १-६ अशी पराभूत झाली. अँजोलिक कर्बर विजयीमहिलांमध्ये अव्वल मानांिकत जर्मनीच्या अँजोलिक कर्बर हिने सहज विजयी सलामी देताना अमेरिकेच्या इरिना फाल्कनी हिचा ६-४, ६-४ असा धुव्वा उडवला. कर्बरच्या आक्रमक खेळापुढे फाल्कनीला फारशी संधी मिळाली नाही. स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझाने रशियाच्या एकतेरिना अलेक्झांड्रोवा हिला ६-२, ६-४ असे सहजपणे नमवले.
स्टॅन वावरिंकाला पराभवाचा धक्का
By admin | Published: July 05, 2017 1:53 AM