नवी दिल्ली : बिश्केकमध्ये आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय कुस्तीला जोरदार झटका बसला आहे. कारण भारताचे दोन आघाडीचे कुस्तीपटू दीपक पूनिया आणि सुजित कलाकल वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे स्पर्धेतून बाद झाले आहेत. दुबईत खराब वातावरणामुळे त्यांचे विमान विलंबाने बिश्केकमध्ये पोहोचले. मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे दोघेही दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकले आणि वजने घेण्याच्या वेळेपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. सूत्रांनी सांगितले की, भारतीय प्रशिक्षकांनी विनंती करूनही आयोजकांनी त्यांना परवानगी दिली नाही.
पूनिया (८६ किलो) टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या जवळ पोहोचला होता. तो आणि सुजित (६५ किलो) पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बिश्केकला पोहोचले. दरम्यान, दुबईवरून जाणारी विमाने विमानतळांवर पाणी साचल्यामुळे रद्द करण्यात आली किंवा विलंबाने पोहोचली.
रशियाचे प्रशिक्षक कमाल मालिकोव आणि फिजियो शुभम गुप्ता यांच्यासह दोघेही जमिनीवर झोपले आणि दुबई विमानतळावर पूरस्थितीमुळे भोजन न मिळाल्याने उपाशीपोटीच राहिले. सुजितचे वडील दयानंद कलाकल म्हणाले की, दोघेही १६ एप्रिलला दुबई विमानतळावर अडकले होते. बिश्केकला जाणारे विमान उपलब्ध होत नव्हते. दोघांचीही मला काळजी वाटते. दोघेही रशियात सराव करत होते आणि त्यांनी दुबईमार्गे बिश्केकला जाण्याचा निर्णय घेतला होता. पॅरिस ऑलिम्पिकची अखेरची जागतिक पात्रता स्पर्धा मे महिन्यात तुर्कीत होणार आहे.