ऑनलाइन लोकमत
ओव्हल (लंडन) दि. 5 - गोलंदाजांना अनुकूल अशा ढगाळ वातावरणात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने केलेला भेदक मारा, त्याला हेझलवूड आणि कमिन्सकडून मिळालेली उत्तम साथ याच्या जोरावर आयसीसी चॅंम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज सुरू असलेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला 182 धावांत गुंडाळले.
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा बांगलादेशचा निर्णय सपशेल चुकला. एकाकी झुंज देत 95 धावांची खेळी करणारा तमीम इक्बाल आणि 29 धावा काढणारा शाकिब अल हसन यांचा अपवाद वगळता बांगलादेशच्या इतर फलंदाजांनी निराशा केली.
17 व्या षटकात बांगलादेशचा डाव 3 बाद 53 असा अडखळल्यावर तमीम आणि शाकिबने बांगलादेशला सावरले. या दोघांमध्ये 6 9 धावांची भागीदारीही झाली. पण शाकीब 29 धावा काढून बाद झाल्यावर बांगलादेशची पुन्हा घसरगुंडी उडाली. मात्र एक बाजून लावून घरणाऱ्या तमीमने संघाला 180 धावांपर्यंत पोहोचवले. पण शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच तमीम स्टार्कची शिकार झाला आणि त्यानंतर बांगलादेशचे उर्वरित तीन फलंदाज केवळ एका धावेची भर घालून माघारी परतले. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने चार, झम्पाने दोन तर हेझलवूड, कमिन्स, हेड आणि हेन्रिक्स यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले.