ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - तिस-या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेला मुकावे लागणार आहे. स्टार्कच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे तो उर्वरित दोन कसोटीमध्ये खेळू शकणार नाही. पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारताची डोकेदुखी वाढवली होती.
फिरकीला अनुकूल खेळपट्टीवरही भेदक मारा करुन भारताचा डाव अडचणीत आणला होता. गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही त्याने चमक दाखवली होती. पुणे कसोटीत स्टार्कने झळकावलेले अर्धशतकही निर्णायक ठरले होते. बंगळुरु कसोटी स्टार्कच्या उजव्या पायामध्ये दुखापत होती.
आज सकाळी स्कॅनिंगमध्ये स्टार्कला दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले असे ऑस्ट्रेलियन संघाचे फिजीयो डेव्हीड बीकली यांनी सांगितले. दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेलेला स्टार्क दुसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श खांद्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.