पॅरिस : दिमित्री पायेतच्या गोलच्या जोरावर यजमान फ्रान्सने युरोपियन चषक स्पर्धेत रोमानियावर २-१ने मात करून विजयी सलामी दिली. फ्रान्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी हजेरी लावली. या स्टेडियमवर गेल्या १४ नोव्हेंबर रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पूर्वार्धात दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. उत्तरार्धात फ्रान्सने जोरदार आक्रमण केले. पायेत याने दिलेल्या पासवर आॅलिवियर गिरोड याने ५७व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर रोमानियाच्या बोगडान स्टांकू याने ६५व्या मिनिटाला संघाला बरोबरी साधून दिली. सामना बरोबरीत सुटेल असे वाटत असताना ८९व्या मिनिटाला पायेत याने २५ मीटर अंतरावरून निर्णायक गोल केला.