नवी दिल्ली : अलीकडेच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी भरघोस यश संपादन केले. राज्यातील सांगली जिल्ह्यातील संकेत सरगर याने भारतासाठी पहिले पदक जिंकले होते. इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण 61 पदके पटकावली, ज्यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य व २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील एकूण 7 खेळाडूंनी पदके जिंकली असून त्यांना महाराष्ट्र सरकारने मोठे बक्षीस जाहीर केले आहे.
राज्यातील या पदकविजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने आधी जाहीर केलेल्या रकमेत मोठी वाढ केली आहे. सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रथम 12 लाख 50 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आता त्यातवाढ करून थेट 50 लाख एवढे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांची बक्षिसाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली.
प्रशिक्षकांच्या बक्षिसातही केली वाढ यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 14 खेळाडू सहभागी झाले होते. यातील 7 खेळाडूंना पदक जिंकण्यात यश आले. पदकविजेत्या खेळाडूंना केंद्र सरकारने 30 लाख तर महाराष्ट्र सरकारने 12 लाख 50 हजार रूपये देण्याचे जाहीर केले होते. या बक्षीसात महाराष्ट्र सरकारने विक्रमी वाढ केली असून खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. तसेच रौप्य पदक विजेत्यांना 7 लाखांहून 30 लाख देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय कांस्य पदक विजेत्यांना 5 लाखांहून आता 20 लाख दिले जाणार आहेत. लक्षणीय बाब म्हणजे खेळाडूंच्या प्रशिक्षकांना देखील तीन लाखाच्या जागी 12 लाख देण्यात येणार आहेत.
देशासाठी सुवर्णपदक जिंकणारे शिलेदार मिराबाई चानू ( वेटलिफ्टिंग), जेरेमी लालरीनुंगा ( वेटलिफ्टिंग), अचिंता शेऊली ( वेटलिफ्टिंग), लॉन बॉल महिला सांघिक, पुरूष सांघिक टेबल टेनिस, सुधीर ( पॅरा पॉवरलिफ्टिंग), बजरंग पुनिया ( कुस्ती), साक्षी मलिक ( कुस्ती), दीपक पुनिया ( कुस्ती), रवी कुमार दहिया ( कुस्ती), विनेश फोगाट ( कुस्ती), नवीन मलिक ( कुस्ती), भाविना पटेल ( पॅरा टेबल टेनिस), नितू घांघास ( बॉक्सिंग), अमित पांघल ( बॉक्सिंग), एलडोस पॉल ( तिहेरी उडी), निखत जरीन ( बॉक्सिंग), मिश्र दुहेरी टेबल टेनिस, पी व्ही सिंधू ( बॅडमिंटन), लक्ष्य सेन ( बॅडमिंटन) , पुरुष दुहेरी ( बॅडमिंटन) , अचंथा शरथ कमल ( टेबल टेनिस).
देशासाठी रौप्यपदक जिंकणारे शिलेदार संकेत सरगर ( वेटलिफ्टिंग), बिंद्यारानी देवी ( वेटलिफ्टिंग), शुशिला लिकमबाम ( ज्युदो), विकास ठाकूर ( वेटलिफ्टिंग), मिश्र सांघिक ( बॅडमिंटन), तुलिका मान ( ज्युदो), मुरली श्रीशंकर ( लांब उडी), अंशु मलिक ( कुस्ती), प्रियांका गोस्वामी ( १०००० मीटर चालण्याची शर्यत), अविनाश साबळे ( ३००० मीटर स्टीपलचेस), लॉन बॉल पुरुष सांघिक, मिश्र दुहेरी ( टेबल टेनिस), महिला क्रिकेट, अब्दुल्ला अबूबाकेर ( तिहेरी उडी), सागर अहलावत ( बॉक्सिंग), पुरुष हॉकी संघ. देशासाठी कांस्यपदक जिंकणारे शिलेदार गुरुराजा पुजारी ( वेटलिफ्टिंग), विजय कुमार यादव ( ज्युदो), हरजिंदर कौर ( वेटलिफ्टिंग), लवप्रीत सिंग( वेटलिफ्टिंग), सौरव घोषाल ( स्क्वॉश), गुरदीप सिंग ( वेटलिफ्टिंग), तेजस्वीन शंकर ( उंच उडी), दिव्या काकरन ( कुस्ती), मोहित ग्रेवाल ( कुस्ती), जास्मिन ( बॉक्सिंग), पूजा गेहलोट ( कुस्ती), पूजा सिहाग ( कुस्ती), मोहम्मद हुस्सामुद्दीन ( बॉक्सिंग), दीपक नेहरा ( कुस्ती), सोनालबेन पटेल ( पॅरा टेबल टेनिस), रोहित टोकास ( बॉक्सिंग), महिला हॉकी, संदीप कुमार ( १०००० मीटर चालण्याची शर्यत), अन्नू राणी ( भालाफेक), मिश्र दुहेरी ( स्क्वॉश), श्रीकांत किदम्बी ( बॅडमिंटन), महिला दुहेरी ( बॅडमिंटन), साथियन ज्ञानसेकरन ( टेबल टेनिस).