मुंबई : एअर इंडिया, शिवशक्ती यांनी शिवनेरी सेवा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित "स्व.मोहन नाईक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या" अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे जेतेपद पटकाविले.एअर इंडियाचे या महिन्यातील हे तिसरे राज्यस्तरीय अजिंक्यपद.तर शिवशक्तीचे या हंगामातील हे पाचवे जेतेपद. एअर इंडियाचा सुशांत साईल आणि महात्मा गांधींची सायली जाधव या स्पर्धेतील पुरुष व महिला गटात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.
शिंदेवाडी-दादर(पूर्व)येथील भवानीमाता क्रीडांगणावर आजच्या चौथ्या दिवशी झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने महिंद्राला ३५-१८अशी मात केली. एअर इंडियाने सुरवातच झोकात केली. त्यांच्या असलम इनामदारने आपल्या व संघाच्या पहिल्याच चढाईत बोनस करीत संघाला गुण मिळवून दिला. एअर इंडियाने २गुण घेतल्यानंतर महिंद्राच्या ऋतुराज कोरवीने असलमच्या पायात झेप घेत पहिला गुण घेतला.अनंत पाटीलच्या सलग ३पकडी करीत एअर इंडियाने महिंद्राचा एक टायर निकामी केला.तसेच १०मिनिटाला लोण देत एअर इंडियाने १२-०२अशी हवेत झेप घेली. लोण झाल्यानंतर अनंत पाटीलने एका चढाईत ३गडी टिपत महिंद्राचे इंजिन गरम करण्याचा प्रयत्न केला. पण तो क्षणिक ठरला.मध्यांतराला २०-११अशी एअर इंडिया कडे आघाडी होती. मध्यांतरा नंतर १३व्या मिनिटाला एअर इंडियाने आणखी एक लोण देत ३१-१६अशी आघाडी घेत महिंद्राच्या सर्वच चाकातील हवा काढून घेतली.या लोण नंतर महिंद्राच्या इंजिनातील धडधड थंड झाली. या नंतर महिंद्राला एअर इंडियाचे हवेतील विमान जमिनीवर आणणे जमले नाही.
एअर इंडियाच्या या विजयात असलम इनामदारने १२चढाया करीत १बोनस व ४गुण घेतले.सुशांत साईलने १२चढायात ४गुण घेतले,पण एकदा त्याची अव्वल पकड झाली. आदित्य शिंदेने ६पकडी यशस्वी केल्या. महिंद्राच्या अनंत पाटीलने १४चढायात ५गुण घेतले खरे,पण ५वेळा तो पकडला गेला.पाटीलने हे अपयश आणि बचावातील त्रुटी महिंद्राच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. एअर इंडियाची या सामन्यात सांधिक कामगिरी अतिशय उत्तम होती. त्यांचा ताळमेळ देखील योग्यपणे जुळून आला.
महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने महात्मा गांघीचा २६-१७ असा पाडाव केला. दोन्ही संघाचे काही नामवंत खेळाडू खेळत नसल्यामुळे सामना तसा संथपणे खेळला गेला.मध्यांतरापर्यंत सामन्याचा गुणफलक १६-१०असा शिवशक्तीच्या बाजूने झुकला होता. गुणातील हा फरक शेवटपर्यंत कायम राहिला. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा शिवशक्तीकडे २०-१६अशी आघाडी होती. शेवटी ९गुणांनी शिवशक्तीने हंगामातील या ५व्या राज्यस्तरीय विजयाला गवसणी घातली. वैयक्तिक कामगिरी पेक्षा दोन्ही संघाची सांधिक कामगिरी या सामन्यात उठून दिसली. रक्षा नारकर,पूजा यादव, पौर्णिमा जेधे यांचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला. महात्मा गांधी कडून सायली जाधव, सृष्टी चाळके, तृप्ती सोनावणे यांना अखेर पर्यंत आपला खेळ उंचावता आला नाही. सायलीने या सामन्यात अवघे २गुण घेतले.
देना बँकेचा नितीन देशमुख व महिंद्राचा अनंत पाटील यांना पुरुषांत अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. महिलांत शिवशक्तीच्याच पूजा यादव व पूर्णिमा जेधे या दोघी अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे खेळाडू ठरले. या अगोदर झालेल्या पुरुषांच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एअर इंडियाने रायगड पोलीस संघाला ३४-१९असे, तर महिंद्राने देना बँकेला चुरशीच्या लढतीत ६२-५२असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. महिलांच्या उपांत्य सामन्यात शिवशक्तीने संघर्षला ४४-२५असे, तर महात्मा गांधींने अनिकेतला ४०-१५असे नमवित अंतिम फेरीत धडक दिली होती.