अमरावती : विदर्भ राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी पहिला सामना अमरावती - पुलगाव संघात रंगला. चुरशीच्या लढतीत पुलगावने एका गुणाने बाजी मारली. रुख्मिणी नगरातील नेताजी सामाजिक विकास संस्था व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळापासूनच रंगलेल्या सामन्यात नागपूर व अकोला संघाने वर्चस्व गाजविले. इतरही जिल्ह्यांतील संघांनी उत्तम कामगिरी बजावली. पुरूष विभागातून गाडगेबाबा संघ अमरावती (६३ गुण) व नेताजी क्रीडा मंडळ अमरावती (४७) मध्ये रंगलेल्या सामन्यांत गाडगेबाबा संघाचे पारडे भारी राहिले. महिला विभागात आर.के. स्पोर्ट्स पुलगाव (२७) व धाबेकर विद्यालय कारंजा लाड (२६) यांच्यात रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात पुलगाव संघ एका गुणाने विजयी झाला. शनिवारी सकाळाच्या सत्रात रंगलेल्या सामन्यात रेंज पोलीस (३०), प्रशिक्षण अकोला (३८) यांच्यात रंगलेल्या सामन्यात ८ गुणांची आघाडी घेत अकोला संघाने बाजी मारली.
मराठा लायन्स नागपूर (३५ गुण), शिवाजी कोवरा (३६) यामध्ये शिवाजी संघाने बाजी मारली. न्यू ताज नागपूर (२८) व युवा संताजी सिटी भंडारा जिल्ह्यात रंगलेल्या सामन्यात नागपूर संघाने ३ गुणांनी विजय प्राप्त केला. यंग क्लब अकोला (१९)व संभाजी क्रीडा कळंब (४५) यामध्ये कळंबने एकतर्फी विजय मिळविला. वर्धा पोलीस वर्धा (३३) व हनुमान संघ खामगाव (२६) संघात झालेल्या सामन्यात ७ गुणाने वर्धा संघाने विजय मिळविला. संघर्ष नागपूर (४३) व छत्रपती संघ अमरावती (२९) मध्ये रंगलेल्या सामन्यात नागपूरने भक्कम गुणांनी विजय संपादन केला. सिटी पोलीस नागपूर (३३) व वीर केसरी संघ नांदगाव पेठ (१२) यामध्ये नागपूरने बाजी मारली.
युवा नवरंग अमरावती (१७) व जय बजरंग कारंजा (४३) यांच्यात झालेल्या सामन्यांत सर्वाधिक गुणाने कारंजा संघाने विजय मिळविला. पठाणपुरा चंद्रपूर (३४) व जागृती आर्वी (३०) मध्ये रंगलेल्या सामन्यांत चंद्रपूर संघाने ४ गुणांनी बाजी मारली. वृत्त लिहिस्तोवर इतर संघांचे सामने सुरू होते. सामने पाहण्यासाठी राजकीय पदाधिकाºयांनी मैदानाला भेटी दिल्यात. पुरुष गटातील २६, तर महिला गटातील १६ संघांत सदर सामने रंगणार आहेत.