उत्तर प्रदेशमधील सहानपुर जिल्ह्यात एक लाजीरवाणा प्रकार घडला. येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये १७ वर्षांखालील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले होते आणि ३०० हून अधिक खेळाडू तेथे आले होते. त्यात या खेळाडूंना टॉयलेटमध्ये जेवण वाढलं गेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओनंतर चहुबाजूंनी टीका होतेय.
१६ ते १८ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली आणि त्यादरम्यान खेळाडूंचं खाण टॉयलेटमध्ये ठेवले गेले होते आणि तिथूनच त्यांना जेवण वाढून घ्यावं लागत होतं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंत क्रीडा अधिकारी अनिमेष सक्सेना यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर जिल्हाधिकारी अखिलेश सिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
१६ सप्टेंबरला येथील डॉ. भीमराव आंबेडकर स्टेडियममध्ये अनेक जिल्ह्यांतून खेळाडू सहभाग घेण्यासाठी आले होते. त्यांना दिलं गेलेलं जेवण अत्यंत खराब होतं. डाळ, भाज्या व भात कच्चाच होता. व्हिडीओत हे जेवण टॉललेटमध्ये जमिनिवर ठेवलेलं दिसतंय आणि नाईलाजास्तव खेळाडूंना ते खावं लागतंय. या प्रकारानंतर क्रीडा अधिकाऱ्यांनी त्यांचे मत मांडले, पावसामुळे जेवळ आतमध्ये ठेवावं लागल्याचं त्यांनी सांगितले.
''जेव्हा प्रथम जेवण बनवलं गेलं तेव्हा तांदुळ खराब असल्याने भात चांगला शिजला नाही आणि तो फेकून द्यावा लागला. नंतर पुन्हा तांदुळ मागवले गेले. पण, पाऊस असल्याने स्विमिंग पूलजवळील चेंजिंग रुममध्ये जेवळ ठेवलं गेलं. स्टेडियममध्ये बांधकाम सुरु होते आणि त्यामुळे चेंजिंग रुममध्ये जेवण बनवण्याची सोय केली होती,''असे त्यांनी सांगितले.