मुंबई: बंड्या मारुती क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ठाणे-कल्याणच्या शिवशंकर क्रीडा मंडळाने जेतेपद पटकाविले. शिवशंकर मंडळाचा गणेश जाधव ठरला "स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू". महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.आणि मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत चुरशीनें खेळला गेला.
पुरुषांच्या झालेल्या या अंतिम सामन्यात शिवशंकर मंडळाने विजय क्लबचा कडवा प्रतिकार २८-२०असा मोडून काढत बंड्या मारुती चषक आपल्या नावे केला. मध्यांतरापर्यंत एकमेकांचा अंदाज घेत खेळला गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघ १०-१० असे बरोबरीत होते.मध्यांतरानंतर मात्र सामन्यात खरी चुरस पहावयास मिळाली. मध्यांतरानंतर शिवशंकर मंडळाचे "प्रो-कबड्डी" स्टार श्रीकांत जाधव, निलेश साळुंखे यांनी टॉप गिअर टाकत चढाईत गुण घेत, तर अनुभवी सूरज बनसोडे, तुषार भोईर यांनी आक्रमक पकडी करीत विजय क्लबवर पहिला लोण चढविला. सामन्यातील हा एकमेव लोण. शिवशंकरचा बचाव एवढा भक्कम होता की, विजय क्लबच्या चढाईपट्टूना गुण मिळविणे जड जात होते. विजय दिवेकरचा अष्टपैलू खेळ,अमित चव्हाणच्या चढाया आणि सुनील पाटीलच्या पकडी विजय क्लबला विजय मिळवून देण्यात कमी पडल्या.
या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शिवशंकरने जय भारतला ४१-२०असे नमविलें. दुसरा सामन्याचा निकाल मात्र "सुवर्ण चढाईवर" लागला.त्यात विजय क्लबने २२-२२ आणि ५-५चढायांच्या डावात २७-२७(५-५)अशा बरोबरी नंतर स्वस्तिक मंडळावर बाजी मारली. विजय क्लबच्या विजय दिवेकरने सुवर्ण चढाईत गडी टिपत संघाला अंतिम फेरीत नेले.उपांत्य पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु.पंधरा हजार(₹ १५,०००/-) देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकड या दोन्ही पारितोषिकांचा मान मात्र विजय क्लबच्या दोन खेळाडूंनी मिळविला.स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक अमित चव्हाण, तर उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक विजय दिवेकर यांनी पटकाविले.