विजय क्लब, जय भारत क्रीडा मंडळ, अंकुर स्पोर्ट्स क्लब या मुंबई शहरच्या संघा बरोबर मुंबई उपनगरच्या जॉली स्पोर्ट्स क्लबने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या “शतक महोत्सवी वर्षानिमित्त” आयोजित “चिंतामणी चषक” पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. विजय क्लब विरुद्ध जय भारत आणि अंकुर स्पोर्ट्स विरुद्ध जॉली स्पोर्ट्स अशा उपांत्य लढती होतील.
लालबाग-मुंबई येथील सदगुरु भालचंद्र महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जय भारत मंडळाने केदारनाथ क्रीडा मंडळाचा प्रतिकार ३५-२० असा मोडून काढत उपांत्य फेरी गाठली. पूर्वार्धात पहिला लोण चढवीत जय भारतने २०-११ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात संयमी खेळ करीत आणखी एक लोण देत आपला विजय निश्र्चित केला. केदारनाथने पूर्वार्धात ३अव्वल पकड करीत कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. पण जय भारतच्या भक्कम बचाव आणि आक्रमक चढाया पुढे केदारनाथची मात्रा चालली नाही. सागर कावीलकर, अभिजित घोडे यांच्या चढाया आणि बाजीराव होडगे, मधुकर गर्जे यांचा भक्कम बचाव जय भारतच्या विजयात महत्वाचा ठरला. चेतन आणि सुशांत या कदम द्वयींचा खेळ केदारनाथ मंडळाचा पराभव टाळू शकला नाही.
दुसऱ्या सामन्यात अंकुर स्पोर्ट्सने विजय बजरंग व्यायाम शाळेला २८-१८असे पराभूत केले खरे परंतु त्याकरिता त्यांना सुरुवातीला कडवा संघर्ष करावा लागला. विजय बजरंगने सुरुवात झोकात करीत अंकुरवर पहिला लोण दिला आणि आघाडी मिळविली. पण हा आनंद क्षणभंगुर ठरला. काही मिनिटाच्या फरकाने अंकुरने त्या लोणची परतफेड करीत सामन्यावर आपली पकड बसविली. मध्यांतराला १४-१२ अशी २ गुणांची महत्वपूर्ण आघाडी मिळविण्यात अंकुरला यश आले. यानंतर मात्र अंकुरने मागे वळून पाहिले नाही. मध्यांतरानंतर आणखी एक लोण देत या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुशांत साईलच्या झंजावाती चढाया आणि त्याला मिळालेली सुभाष साईल, किसन बोटे यांची पकडीची भक्कम साथ यामुळे अंकुरने हा विजय साकारला. खऱ्या अर्थाने सुभाष आणि सुशांत या बाप-बेटयानी अंकुरला हा विजय मिळवून दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विजय बजरंग कडून आकाश निकम, गणेश तुपे, जितेंद्र बुगडे यांच्या सुरुवातीच्या खेळाचा छोटासा अंश देखील उत्तरार्धात पहावयास मिळाला नाही. याचा परिणाम विजय बजरंगच्या पराभवात झाला. शिवाय अक्षय उगाडेची उणीव देखील त्यांना जाणविली.
विजय क्लबने गोलफादेवी सेवा मंडळाला ५४-१४ असे लीलया पराभूत केले. विश्रांतीला २०-०८ अशी आघाडी घेणाऱ्या विजयने नंतर देखील जोशपूर्ण खेळ करीत हा विजय सोपा केला. अजिंक्य कापरे, अक्षय सोनी, विजय दिवेकर, अभिषेक रामाणे या विजयाचे शिल्पकार ठरले. सिद्धेश पिंगळे, शार्दूल हरचकर यांना या सामन्यात सूर सापडला नाही.
शेवटच्या सामन्यात जॉली स्पोर्टसने बंड्या मारुतीला ३४-१७ असे नमविलें. पहिल्या डावात १७-०७अशी आघाडी घेणाऱ्या जॉलीने विशाल राऊत, अभिषेक नर, नामदेव इस्वलकर, अनिकेत पाडलेकर यांच्या चढाई-पकडीच्या खेळाच्या जोरावर ही किमया साधली. पूर्वार्धात एक लोण देत आघाडी घेणाऱ्या जॉलीने उत्तरार्धात आणखी एक लोण देत हा विजय साकारला. बंड्या मारुतीकडून जितेश सापते, शुभम चौगुले, सागर पाटील यांनी कडवी लढत दिली. या अगोदर झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात विजय क्लबने श्री नूतन सोनारसिद्धला ४१-३० असे; बंड्या मारुतीने स्वस्तिक मंडळाला ४०-१९ असे ; तर गोलफादेवीने आई अष्टभुजाला ३५-२५ असे पराभूत करीत उपउपांत्य फेरी गाठली होती.