नवी दिल्ली : खेळ सुरू करण्याची कुठलीही घाई करू नका. कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप लक्षात घेता किमान तीन महिने प्रतीक्षा करण्याचे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी सर्व राज्यांना केले.देशातील क्रीडा सराव आणि आयोजनाच्या शक्यतेची समीक्षा करताना रिजिजू यांनी सर्व राज्यांना पुढीन तीन महिने कुठलीही परवानगी बहाल न करण्याचे आवाहन केले. ‘क्रीडा आयोजन आणि सराव कधी सुरू करायचा याची समीक्षा राज्यांनी स्वत: करावी. सर्वांनी दोन किंवा तीन महिने प्रतीक्षा करावी, असा माझा आग्रह राहील,’ असे रिजिजू यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्रीडामंत्र्यांसोबतच्या आॅनलाईन बैठकीत स्पष्ट केले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शारीरिक संपर्क न होणारे खेळ सुरू करता येतील, असेही ते म्हणाले.‘काही राज्यांनी क्रीडासंकुले मोकळी करून सरावास परवानगी दिली आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यास आम्ही मैदाने पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करणार आहोत,’ अशी माहिती त्यांनी दिली. (वृत्तसंस्था)
खेळ सुरू करण्यासाठी राज्यांनी तीन महिने थांबावे - क्रीडामंत्री किरेन रिजिजू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:55 AM