सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचनं ( Novak Djokovic) दुसऱ्यांदा फ्रेच ओपन स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफानोस त्सिस्तीपास ( Stefanos Tsitsipas ) याच्याकडून त्याला कडवी टक्कर मिळाली, परंतु 0-2 अशा पिछाडीवरून नोव्हाकनं कमबॅक केलं अन् अंतिम सामना 6-7 ( 6/8), 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा जिंकला. नोव्हाकचे हे 19वे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. पण, प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी खेळणाऱ्या स्टेफानोसवर सामना सुरू होण्याच्या पाच मिनिटांआधी दुःखाचा डोंगर कोसळला. कोर्टवर उतरण्यापूर्वी त्याला आजीचे निधन झाल्याची बातमी समजली. तरीही 22 वर्षीय स्टेफानोस कोर्टवर उतरला अन् जगातील अव्वल खेळाडूला विजयासाठी झुंजवले. ( Greek tennis star Stefanos Tsitsipas has revealed that he learned of his grandmother’s death just minutes before his French Open final)
स्टेफानोसनं इस्टाग्रामवर पोस्ट लिहून ही दुःखद घटना सांगितली. तो म्हणाला,कोर्टवर दाखल होण्याच्या पाच मिनिटांपूर्वी माझ्या आजीनं मृत्यूशी झुंज हरल्याची बातमी मला समजली. आयुष्यात तिच्याइतका माझा कोणावर विश्वास नव्हता. तिनं दिलेल्या प्रेमाची माझ्या आयुष्यातील इतर कोणत्याच व्यक्तीसोबत तुलना होऊ शकत नाही. जगाला तिच्यासारख्या व्यक्तींची गरज आहे, कारण तिच्यामुळे जगण्याची प्रेरणा मिळते. तुम्हाला स्वप्न पाहण्याचं बळ मिळतं. ''