मेलबर्न : कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने झळकावलेल्या कारकिर्दीतील १७व्या शतकाच्या जोरावर यजमान आॅस्टे्रलियाने पाकिस्तानविरुध्दच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसअखेर २२ धावांची माफक आघाडी मिळवली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा आॅस्टे्रलियाने ६ बाद ४६५ धावांची मजल मारली होती. कर्णधार स्मिथ १०० धावांवर खेळत असून मिशेल स्टार्क (७*) त्याला साथ देत आहे.मेलबर्न क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात पावसाने व्यत्यय टाकल्याने हा सामना अनिर्णित राहणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. चौथ्या दिवशी चहापानापुर्वीच हवामान बिघडल्याने सामना थांबविण्यात आला. यानंतर खराब हवामानामुळे एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. स्मिथने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवताना यंदाच्या वर्षातील चौथे कसोटी शतक झळकावले. विशेष म्हणजे स्मिथने सलग तिसऱ्या वर्षी एका वर्षात एक हजार कसोटी धावा पूर्ण केल्या. यंदा त्याने ६७.६० च्या जबरादस्त सरासरीच्या जोरावर १,०४० धावा काढल्या आहेत. या सामन्यात शतक झळकावताना स्मिथने १६८ चेंडूंचा सामना करताना ९ चौकारांनी आपली खेळी सजवली. तत्पूर्वी, चौथ्या दिवशी २ बाद २७८ धावांवरुन सुरुवात करताना ९५ धावांवर नाबाद असलेला उस्मान ख्वाजा आणखी २ धावा करुन बाद झाला. यामुळे त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. वहाब रियाझच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक सरफराज अहमदला झेल देऊन ख्वाजा परतला. त्याने १६५ चेंडूत १३ चौकारांसह ९७ धावा फटकावल्या. यानंतर पीटर हँड्सकॉम्ब (५४) आणि स्मिथ यांनी चौथ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. (वृत्तसंस्था)धावफलकपाकिस्तान (पहिला डाव) : १२६.३ षटकात ९ बाद ४४३ धावा (घोषित)आॅस्टे्रलिया (पहिला डाव) : मॅट रेनशॉ त्रि. गो. यासिर शाह १०, डेव्हीड वॉर्नर झे. सरफराझ गो. रियाझ १४४, उस्मान ख्वाजा झे. सरफराझ गो. रियाझ ९७, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे १००, पीटर हँड्सकॉम्ब झे. समी असलम गो. सोहेल खान ५४, निक मॅड्डीनसन त्रि. गो. यासिर शाह २२, मॅथ्यू वेड झे. असद शफिक गो. सोहेल खान ९, मिशेल स्टार्क खेळत आहे ७. अवांतर - २२. एकूण : ११३.५ षटकात ६ बाद ४६५ धावा.गोलंदाजी : मोहम्मद आमिर २७-५-७४-०; सोहेल खान २३.५-७-८६-२; यासिर शाह ३४-२-१५०-२; वहाब रियाझ २७-३-१३५-२; अझहर अली २-०-११-०.
स्टीव्ह स्मिथचे १७ वे कसोटी शतक
By admin | Published: December 30, 2016 1:36 AM