ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १९ - 'मला अजूनही पुर्णपणे स्वतंत्र झाल्यासारखं वाटत नाही आहे. स्वातंत्र्याची भावना अजून मनापासून जाणवत नाही आहे', असं नुकताच शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेल्या संजय दत्तने म्हंटलं आहे. 'मी जेलमध्ये आणि जेलबाहेर असा 23 वर्षांचा प्रवास केला आहे. माझ्यावर अनेक बंधने होती, परवानगी घ्यावी लागायची. स्वतंत्रपणे जगण्याची सवय सध्या करुन घेत आहे. अजून ती भावना आलेली नाही',असं संजय दत्त बोलला आहे.
इंडिया टुडेशी बोलताना त्याने आपलं मन मोकळं केलं आहे. 'तुम्हाला शारिरकरित्या आणि मानसिकरित्या कोंडून ठेवलं जातं. ते तुम्हाला काय करा ? आणि काय करु नका ? सांगत असतात. मला कोणत्याही प्रकारची व्हीआयपी वागणूक देण्यात आली नसल्याचंहीट', संजय दत्तने स्पष्ट केलं आहे. 'प्रत्येकाला वाटतं मला विशेष वागणूक देण्यात आली मात्र माझ्यासोबत असणा-या कैद्यांपेक्षा वाईट वागणूक मला देण्यात आली. कारागृहातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे जेवण, ते अत्यंत भयानक असतं आणि खाण्यायोग्य अजिबात नसल्याचं', संजय दत्त बोलला आहे.
मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरूगांत शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची 25 फेब्रुवारीला येरवडा तुरूंगातून सुटका झाली आहे.